'लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल'... अशी खंडणी मागणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:40 PM2021-07-30T19:40:04+5:302021-07-30T19:47:08+5:30
पुणे सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी परिसरातील घटना
पुणे : आम्ही ददू भाईची माणसे आहोत, लॉज चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल, असे सांगत शहरातील पुणे सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी परिसरातील लॉज चालकाकडे खंडणीची मागणी करीत लॉजची तोडफोड केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गोरख कानकाटे टोळीवर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
शुभम उर्फ ददू कानकाटे (वय २४, रा. कोरेगाव, ता. हवेली), अमित डोरले (वय २०, रा. सोरतापवाडी, ता. हवेली), साईराज कानकाटे (वय १९, रा.कोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सोरतापवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांचे सोरतापवाडी येथे हॉटेल व लॉज आहे. २६ जुलैला डोरले त्याठिकाणी गेला असता त्याने तक्रारदाराला फोन देऊन बोलण्यास सांगितले. त्यानंतर फोनवरून ददू कानवटे याने त्यांच्याकडे ५० हजार रुपये हप्ता 5 तारखेपर्यंत द्यावा लागेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे दोन दुचाकीवरून आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी हातामध्ये कोयते फिरवून दहशत निर्माण करत लॉजवर दगडफेक केली. आरोपींनी आरडा-ओरडा केल्यामुळे शेजारील नागरिक पळून गेले. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमुळे लॉजच्या खिडक्या, दरवाजाचे नुकसान झाले.
त्यानंतर आरोपींनी २८ जुलैला आरोपी दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदार यांना फोन करून लॉजच्या खाली बोलावून घेतले. त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवले. धंदा करायचा असेल तर दर महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी दमबाजी केली. पैसे न दिल्यास तुझा धंदा चालू देणार नाही, अशी धमकी दिली. तू माझ्या डोक्यात बसू नकोस, मी लय वेडा आहे, मी तुला मारायला घाबरणार नाही, पोलीस माझे काहीही करू शकत नाहीत. तुझ्या शेजारचा लॉजवाला मला महिन्याला दहा हजार रुपये देतो, तुला मस्ती आलीय, तुझी गेम करून टाकील, अशी आरोपीने धमकी दिली.
यानंतर तक्रारदार यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुंड गोरख कानकाटे याचा पुतण्या ददू व इतर अशा तिघांना अटक केली आहे. तर, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.