तहसीलदारांसाठी ५० लाखांची लाच मागणाऱ्या खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:24+5:302021-07-02T04:09:24+5:30
पुणे : जमिनीच्या७/१२मधील नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतच्या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या ...
पुणे : जमिनीच्या७/१२मधील नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतच्या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खासगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दिलीप दंडवते (रा. साई पार्क, दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या मित्राच्या सर्व्हे नंबर ४४४/१/१/१/१ या जमिनीच्या ७/१२ मधील नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतच्या सुनावणीचा निकाल तहसीलदार पिंपरी-चिंचवड यांच्याकडून तक्रारदार यांचे मित्राच्या बाजूने लावून देण्याचे दिलीप दंडवते याने दिले होते. त्यासाठी त्याने पिंपरी चिंचवड तहसीलदार यांच्यासाठी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार त्यांची २२ जानेवारी २०२० रोजी पडताळणी झाली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष लाच स्वीकारली गेली नव्हती. त्यानंतर आता तक्रारदाराने पुन्हा संपर्क साधल्यानंतर लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दीड वर्षानंतर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद गोर्डे अधिक तपास करीत आहेत.