गजानन मारणे टोळीतील रूपेश मारणेविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:56+5:302021-02-24T04:12:56+5:30
नागरिकाला धमकावले : रस्त्यावर केक कापून पसरवली दहशत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या ...
नागरिकाला धमकावले : रस्त्यावर केक कापून पसरवली दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील रूपेश मारणे व त्याच्या साथीदारांनी जमावबंदीचे उल्लंघन करून मध्यरात्री भररस्त्यावर वाढदिवसाचा केक कापून तेथे असलेल्या नागरिकास धमकविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रूपेश मारणे व त्याच्या ७ ते ८ समर्थकांवर याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रास्ता पेठेतील चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल येथील रस्त्यावर १४ फेब्रुवारी रोजी घडली होती.
समर्थ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन जाधव व बालाजी शिंदे हे १४ फेब्रुवारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूलजवळ एक व्यक्ती घाबरलेली दिसली. त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने एक दाढी वाढलेली व्यक्ती रस्त्यावर वाढदिवस साजरा करत आहे. त्या व्यक्तीला वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीने दमबाजी केली. तसेच, ‘‘काय बघतोस माज आला का, मी रूपेशदादा मारणे पुण्याचा भाई. तुलाही केकसारखा कापेल’’, असा दम दिला. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर रूपेश व त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यानंतर घाबरलेला तरुणदेखील निघून गेला. याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली होती. या घटनेची माहिती घेतली असता आरोपींनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तसेच, पोलिसांच्या नियमांचे पालन केलेले दिसून आले नाही. त्यानंतर विविध कायद्यानुसार रूपेश मारणेसह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत.