कात्रजमध्ये स्पीकर लावून धुलवड साजरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:43+5:302021-03-31T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : धुलिवंदनाला स्पीकर लावून नाचत असलेल्यांना समजावून सांगायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत गणवेशाची कॉलर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : धुलिवंदनाला स्पीकर लावून नाचत असलेल्यांना समजावून सांगायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत गणवेशाची कॉलर पकडण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संदीप सोमनाथ भोवते (वय ४५), सागर संदीप भोवते (वय १९, दोघे रा़ सच्चाईमाता, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी गणेश काळे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सच्चाईमाता येथील पाण्याच्या टाकीजवळील सार्वजनिक रोडवर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
आरोपी संदीप व सागर हे दोघे येथील सार्वजनिक रोडवर मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता स्पीकर लावून नाचत गोंधळ घालत होते. याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी काळे हे तेथे दाखल झाले. त्यांनी दोघांना गोंधळ करून नका असे समजावून सांगितले. मात्र, आरोपींनी काळे यांचे न ऐकता, त्यांनाच अरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या सरकारी गणवेशाची कॉलर पकडून ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे करीत आहेत.