शिरूर तालुक्यात २५ लाखांच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 06:54 PM2021-05-18T18:54:33+5:302021-05-18T18:54:39+5:30
सापळा रचून दोघांना पकडले
शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील पोलिसांच्या पथकाने कोरेगाव भीमा जवळ असणाऱ्या वडगाव परिसरात तस्करी करणाऱ्या दोघांकडून तब्बल पंचवीस लाखांचा दुर्मिळ असा मांडूळ जातीचा साप जप्त केला आहे. याप्रकरणी प्रमोद अजितराव साळुंके (वय २४, रा. कोरेगाव भीमा) व सागर गजानन जाधव (वय २२ रा. शिरूर) या दोन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई बापू भास्कर हाडगळे (रा. शिक्रापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडगाव येथे दोन युवकांनी मांडूळ जातीचा साप पकडून ठेवला असून त्याची तस्करी करणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्या पथकाने वडगाव परिसरात सापळा रचला. त्यांना दोघे संशयित युवक दुचाकीहून जाताना दिसले. त्यांच्या जवळ निळ्या रंगाचा बॉक्स होता. या दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.
पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडून त्यांच्या जवळ पाहणी केली. निळ्या बॉक्समध्ये माती असल्याचे आढळून आले. मातीखाली तपासणी केल्यावर त्यामध्ये मांडूळ जातीचा साप असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या जवळील तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचा दुर्मिळ मांडूळ जातीचा साप दुचाकी तसेच दोन मोबाईल असा तब्बल पंचवीस लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेला मांडूळ जातीचा साप शिरुर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.