विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:02+5:302021-05-30T04:09:02+5:30
सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथील गीतांजली अभिषेक तावरे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी विष ...
सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथील गीतांजली अभिषेक तावरे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह, सासू-सासरे व दोन नणंद अशा पाच जणांविरुद्ध हत्या, हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचारासह विविध कलमन्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. पती अभिषेक वसंत तावरे याला अटक केली असून नणंद सासू, सासऱ्याचा तपास सुरू आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार: याबाबत मयत गीतांजलीचे वडील सुनील लालासाहेब यादव (वय ४८, व्यवसाय शेती, रा. गुरसाळे, ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे. सचिता सचिन काळभोर (रा. लोणी काळभोर, ता.हवेली जि.पुणे ), वर्षा वाबळे (रा. पुणे ), शारदा वसंत तावरे (रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे), अभिषेक वसंत तावरे (रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे), वसंत केशवराव तावरे (रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विवाह झाल्याच्या दिवशीच गीतांजलीला नणंद सचिता हिने तुम्ही माझ्या भावाचे लग्न थाटामाटात केले नाही. यावरून सतत अपामानास्पद वागणूक दिली. पती अभिषेक तावरे याने मयत पत्नी गीतांजलीला तुझ्या बापाची ऐपत तरी आहे का ? लग्नात कमीत कमी ४०ते ५० तोळं सोन तुझ्या बापाने द्यायला पाहिजे होतं, आमच्या भावकीत नाक नाही ठेवलं दाखवायला असे म्हणून, गीतांजलीचे वडील वसंत तावरे यांनी गीतांजलीला २० तोळं सोनं दिले तरच पोरीला नांदू देणार, असे म्हणून सर्वांनी मयत गीतांजली हिचा मानसिक व शारीरिक त्रास चालूच ठेवला होता. लग्नात हुंडा म्हणून एकूण १२ तोळे सोने,रोख रक्कम एक लाख रुपये व दीड लाख रुपये संसारोपयोगी साहित्य घेऊन देखील ५० तोळे सोने माहेरून घेऊन ये म्हणून छळ केला. या सर्व जाचाला कंटाळून अखेर तिने जीवन संपविण्याचा निर्णय घेऊन लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी तिने विषारी औषध प्राशन केले व तिच्या आत्महत्येस सासरकडील सर्व जबाबदार असल्याचे दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२४) रोजी मयत गीतांजली अभिषेक तावरे (वय २१) हिने जाचाला कंटाळून विष प्राशन केले होते. दरम्यान, तिच्यावर बारामतीनंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारदरम्यान गुरुवारी (दि. २७ ) रोजी तिचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.२८) रोजी सासरच्या दारातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गीतांजलीच्या मृत्यूनंतर सासरच्या दारातच तिचा अंत्यविधी करण्यावर माहेरील नातेवाईक ठाम राहिल्याने सांगवीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अंत्यसंस्कार दरम्यान दोन दिवसांपासून सांगवीत पोलीस निरीक्षक महेश ढवाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करून परिस्थिती हाताळली होती. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे अधिक तपास करीत आहेत.
२९०५२०२१-बारामती-०९