नालेसफाई न झाल्यास ठेकेदारांची बिले रोखणार
By admin | Published: June 24, 2017 06:06 AM2017-06-24T06:06:41+5:302017-06-24T06:06:41+5:30
शहरातील नालेसफाईची कामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील नालेसफाईची कामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या कामांची तपासणीही केली जात आहे. यामध्ये कामे व्यवस्थित झाली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारांची बिले रोखण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी शुक्रवारी मुख्य सभेला दिली.
शहरात मागील आठवड्यात झालेल्या पहिल्याच पावसाने मोठी दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शुक्रवारी मुख्य सभेला सुरुवात होताच नगरसेवकांनी नालेसफाईचा प्रश्न उपस्थित केला. पावसाळ्याच्या पूर्वी शहरात करण्यात आलेली नालेसफाई अत्यंत निराशाजनक असल्याची टीका या वेळी नगरसेवकांनी केली. पाऊस येण्याआधी शहरात असणाऱ्या
सर्व नाल्यांची दरवर्षी
साफसफाई केली जाते. यंदा मात्र ७० टक्के कमी रकमेने निविदा भरण्यात आली होती. त्यामुळे एवढ्या कमी रकमेत काम घेऊन ठेकेदाराने काहीही काम केले नसल्याचा आरोप सभासदांनी केला. प्रेरणा देशभ्रतार यांनी खुलासा केला.
त्या म्हणाल्या, ‘‘शहरातील पाचही परिमंडळांच्या नालेसफाईचा अहवाल मागविण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या विभागांचे काम झालेल्या ठिकाणांची फेरतपासणी करण्यात येत आहे.’’
अद्यापही कामे ठप्पच पाऊस झाल्यास पाणी तुंबणार
1राष्ट्रवादीचे दिलीप बराटे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाने नालेसफाई केली नसून याला कोण जबाबदार, अशी विचारणा त्यांनी केली. दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी, प्रशासन अजूनही ढिम्म आहे, काहीही काम केले नसून पुन्हा पाऊस झाला तर पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले. 2नगरसेविका वृषाली चौधरी यांनी कर्वेनगर उड्डाणपुलाचा राडारोडा साचून काकडे सिटी
भागात पाणी साचत असल्याची तक्रार केली. बापूराव कर्णे गुरुजी यांनी नालेसफाई अजिबात
झाली नसून दुभाजक काढून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी केली.