आमदार सुनील शेळकेंच्या भावावर 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: September 16, 2022 01:52 PM2022-09-16T13:52:49+5:302022-09-16T13:55:36+5:30
आमदाराच्या भावाविरोधात गुन्हा दाखल...
पिंपरी : जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १५) दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एक गुन्हा मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यावर तर दुसरा गुन्हा तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या विरोधात दाखल करण्यात आला.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात वाहन चालक असलेल्या ३६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार सुधाकर शेळके आणि मॉण्टी दाभाडे (दोघेही रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे १० सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या समोरील सेवा रस्त्यावर (लिंब फाटा) सार्वजनिक ठिकाणी थांबले होते. त्यावेळी फिर्यादी यांना अपमानित करण्याच्या उद्देशाने आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
दुसऱ्या प्रकरणात ३४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यानुसार किशोर आवारे, मिलिंद अच्युत (दोघेही रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ या कालावधीत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या आवारातील कॅन्टीनच्या बाजूला थांबलेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट दोन्ही प्रकरणांचा तपास करीत आहेत.