रेणुका देवी दूध संस्था निवडणूक हल्ला प्रकरण; प्रसिद्ध उद्योगपती विकास ताकवणेसह ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 08:02 PM2022-01-17T20:02:58+5:302022-01-17T20:14:29+5:30
ताकवणे हे सिद्धेश्वर इंडस्ट्रीज पिंपरी-चिंचवडचे प्रमुख असून पिंपरी-चिंचवड मध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आहे...
केडगाव (पुणे): पारगाव ( तालुका- दौंड ) येथील विकास ताकवणे (vikas takavane) यांच्या वरती गुंडांच्या साह्याने ताकवणे बंधूंना तीक्ष्ण हत्याराने इजा करण्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. ताकवणे हे सिद्धेश्वर इंडस्ट्रीज पिंपरी-चिंचवडचे प्रमुख असून पिंपरी-चिंचवड मध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आहे. त्यांच्या पत्नी नंदा विकास ताकवणे या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका आहेत. ताकवणे यांनी २०१४ मध्ये दौंड विधानसभा निवडणूक लढवली आहे.
सदर घटना शनिवार दिनांक १५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. गुन्हा केल्याबद्दल विकास बापूराव ताकवणे यांच्यासह अज्ञात पाच गुन्हेगारावर यवत पोलीस स्टेशन मध्ये वरील गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुन्हा बाबत ताकवणे व इतर पाच आरोपींना एकूण १२ कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये कलम क्रमांक ३२३,३२४,१४३,१४७,१४८,१४९ ,३४१, ५०४,५०६ शस्र अधिनियम४,२५ फौजदारी कायदा अधिनियम ७ अधिक कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.
रेणुका देवी दूध संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संस्थापक अध्यक्ष पोपटराव ताकवणे आपले मतदार संस्थेच्या कार्यालयमध्ये घेऊन येत असताना प्रवेशद्वाराजवळ अज्ञात पाच जणांनी एका फॉर्च्युनर (एम एच १२ के.आर.९२९२)गाडीतुन खाली उतरुन फिर्यादी रामकृष्ण ताकवणे यांना विकास बापूराव ताकवणे यांच्या सांगण्यावरून आम्ही आलो असून सदर संचालकांना आम्ही मतदानासाठी आज जाऊ देणार नाही अशी दमदाटी केली.
स्थानिकांनी विरोध केला असता रामकृष्ण ताकवणे यांच्यावर गुंडांनी कोयत्याने हल्ला केला. रामकृष्ण ताकवणे यांना वाचवताना तुकाराम ताकवणे यांना हाताला जखम झाली. चुलत भाऊ सचिन ताकवणे यांच्या डोळ्याखाली हल्ल्यामध्ये जखम झाली. अज्ञात इसमापैकी एकाने कोयता घटनास्थळी ठेवून सर्वांनी फॉर्च्युनर गाडीमध्ये पलायन केले. यावरून रामकृष्ण ताकवणे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
फॉर्च्यूनर गाडीबाबत धक्कादायक माहिती-
या हल्ल्यामध्ये गुंडांनी आणलेली फॉर्च्युनर गाडी पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद सदस्यच्या नावावरती आहे. त्यांनी एका इसमला गेली दीड वर्षापासून गाडी विकण्यासाठी दिली आहे. तीच फॉर्च्युनर गाडी या हल्ल्यामध्ये वापरण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.