आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे पडले महागात
By विवेक भुसे | Published: January 29, 2024 11:35 PM2024-01-29T23:35:04+5:302024-01-29T23:35:34+5:30
आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच महागात पडले आहे.
पुणे : आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आमदार धंगेकर व इतर कार्यकर्त्यांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे. आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी करण्यात येणार होते. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करुन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला होता. शासकीय कार्यक्रमाच्या अगोदरच टाकीचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी टाकीपाशी जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्यावर झालेल्या वादावादीत धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.