धुळवडीला बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल, सिंहगड रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 09:57 AM2024-03-26T09:57:04+5:302024-03-26T09:58:03+5:30
वाहन चालक परवाना नसताना मोटारसायकल चालविल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्या पालकांवर व वाहन मालकावर गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : धुळवड साजरी करताना बेपर्वाईने मोटारसायकल चालवत जाणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले. वाहन चालक परवाना नसताना मोटारसायकल चालविल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्या पालकांवर व वाहन मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सिंहगड रोडवरील तुकाईनगर येथे धुळवडीनिमित्त पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या आदेशानुसार नाकाबंदी केली होती. यावेळी दोघे जण बेलगामपणे मोटारसायकलवरून जात होते. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केल्यावर ते अल्पवयीन असून, त्यांच्याकडे वाहन चालक परवाना नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यांचे पालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मुलांना त्याचे वयाचे २५ वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजूर करू नये, तसेच या वाहनांची नोंदणी १ वर्षांसाठी रद्द करावी, याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पोलिसांनी पत्र दिले आहे.
तरी पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना अगर वाहनांचे मालकांनी आपले वाहन अल्पवयीन मुलांना, तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविण्याकरिता देऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करून वाहने जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी केले आहे.