शिक्षकांना जिल्हा बँकेकडून कॅश क्रेडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:53 AM2018-02-05T00:53:48+5:302018-02-05T00:53:52+5:30
शिक्षकांना जिल्हा बँकेकडून पाच लाख रुपयांचे कॅश क्रेडिट देण्याची घोषणा शिक्षण परिषदेत करण्यात आली आहे.
बारामती : शिक्षकांना जिल्हा बँकेकडून पाच लाख रुपयांचे कॅश क्रेडिट देण्याची घोषणा शिक्षण परिषदेत करण्यात आली आहे. मात्र, बँकेकडे पगाराचा दाखला मुख्याध्यापकांचा पाठविण्याची मागणी करण्यात आली. यावर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचा दाखला पाठविण्यासाठी शिक्षण विभागाने दोन दिवसांत परिपत्रक काढण्याचे आदेश वळसे-पाटील यांनी दिले. पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या फास्टट्रॅक निर्णयाचा अनुभव शिक्षकांना मिळाला.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शनिवारी प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांची भेट घेतली. या वेळी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर विवेक वळसे-पाटील यांनी तातडीने कार्यवाहीच्या सूचना शिक्षणाधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
नुकतीच जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद पुणे येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे झाली होती. या वेळी शिक्षकांच्या जिल्हास्तरीय विविध प्रश्नांवर शिक्षण सभापती विवेक वळसे-पाटील यांनी दिलासादायक घोषणा केल्या होत्या. या घोषणांबाबतच्या कार्यवाहीचे आदेश वळसे-पाटील यांनी शिक्षण विभागास दिले.
जिल्हा बँकेकडून पाच लाख रुपयांचे कॅश क्रेडिटसाठी मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचा दाखला पाठविण्यासाठी शिक्षण विभागाने दोन दिवसांत परिपत्रक काढण्याचे आदेश वळसे-पाटील यांनी दिले. जिल्हाभरातील अनुदानित व विनाअनुदानित सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा मार्च महिन्यात सकाळी भरत असल्याने सगळीकडे शालेय वेळ एकसारखी राहण्यासाठी १ मार्चपासून जिल्हा परिषदेच्याही शाळा सकाळी भरविण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या वेळी वळसे-पाटील यांनी दिले.
यावर्षीच्या २३ आॅक्टोबरच्या वरिष्ठ वेतनश्रेणीच्या शासननिर्णयामुळे अनेक प्रस्ताव रेंगाळले आहेत. २३ आँक्टोबरपूर्वी १२ वर्षे पूर्ण केलेल्या ५०० हून अधिक शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. जुन्या नियमाप्रमाणे या शिक्षकांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी वळसे-पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांना सूचना दिल्या.
पदवीधरपदावरून पदावनत होत असलेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुका देऊन पदवीधर व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करावी, फंड प्रकरणांसाठी प्रस्ताव पुन्हा पंचायत समितीस न पाठवता तत्काळ मंजुरी देणे, असे आदेश वळसे-पाटील यांनी दिल्याने शिक्षकांना दिलासा मिळाल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
या बैठकीसाठी शिक्षणाधिकारी शैलजा दराडे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण, कार्यालयीनप्रमुख शिल्पा मेनन यांच्यासह शिक्षण विभागातील
फंड, वरिष्ठ वेतनश्रेणी, शालार्थ, पदोन्नती आदी विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
>...प्रस्ताव वेळीच मार्गी लावण्यासाठी नियोजन
जिल्हा परिषदेमधील आस्थापनेत शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रस्ताव रेंगाळत न ठेवता वेळीच मार्गी लावण्यासाठी नियोजन केलेले आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी सांगितले.
>जलदगती निर्णयामुुळे शिक्षकांना दिलासा
जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडल्याचा अनुभव आहे. मात्र, शिक्षण सभापती विवेक वळसे-पाटील व शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्या जलदगती निर्णयामुळे शिक्षकांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागल्याचा दिलासा शिक्षकांना मिळणार आहे, असे बाळासाहेब मारणे यांनी सांगितले.