दुय्यम निबंधक कार्यालये होणार कॅशलेस
By Admin | Published: February 18, 2017 03:51 AM2017-02-18T03:51:47+5:302017-02-18T03:51:47+5:30
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता दुय्यम निंबधक कार्यालयात पाँइट आॅफ सेल (पॉस) यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता दुय्यम निंबधक कार्यालयात पाँइट आॅफ सेल (पॉस) यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्यास राज्य सरकारने मान्यतादेखील दिली आहे. त्यामुळे आता दस्त हाताळणी शुल्क डेबिट कार्डद्वारे भरता येणार आहे.
नोंदणी विभागाने मुद्रांक शुल्क आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त हाताळणी शुल्क हे रोख स्वरूपात घेण्यात येते होते. केंद्र सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त हाताळणी शुल्क स्वीकारण्यासाठी अडचणी आल्या होत्या.
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना प्रतिपान २० रुपये या दराने शुल्क आकारले जाते. दस्तनोंदणी कार्यालयात कोणतेही शुल्क रोख स्वरूपात द्यायला लागू नये, यासाठी नोंदणी विभागाने हा प्रस्ताव पाठविला होता. त्यास शासनाने मान्यता दिली असून राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातही पॉस मशीन बसविण्यात येणार आहेत. राज्यात पाचशेपेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये असून या ठिकाणी पॉस मशीन बसविल्यानंतर डेबिट कार्डद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार आहे.