उमेदवारांसाठीही कॅशलेस पद्धत
By admin | Published: January 13, 2017 03:43 AM2017-01-13T03:43:47+5:302017-01-13T03:43:47+5:30
पालिकेच्या निवडणुकीतील उमेदवाराने व त्याच्या पक्षानेही निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते सुरू करून त्यातूनच
पुणे : पालिकेच्या निवडणुकीतील उमेदवाराने व त्याच्या पक्षानेही निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते सुरू करून त्यातूनच खर्च करायचा आहे. बँकेतून आठवड्याला किती पैसे काढायचे, याचे बंधन असल्याने उमेदवाराला खर्चासाठी कॅशलेस पद्धतीचा वापर करावाच लागणार आहे. उमेदवाराने सोशलमीडियावर केलेला प्रचारही तपासण्यात येणार असून त्यात काही आक्षेपार्ह, नियमांचा, कायद्याचा भंग करणारे आढल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. आयोगाने निवडणूक प्रक्रिया आदर्शपणे पार पडावी, यासाठी विविध सूचना केल्या असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. मात्र, असे करताना सर्वसामान्य नागरिकांना कशाचाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पाणी, वीज, कचरा यासारखी अत्यावश्यक कामे सुरूच राहतील, त्यांना आचारसंहितेचा काहीही अडथळा होणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्त म्हणाले, ‘‘उमेदवारांना ५ लाख रूपये खर्चाची मर्यादा आहे. पक्षाने, उमेदवाराच्या समर्थकाने व खुद्द उमेदवाराने अशा सर्वांनी मिळून केलेला खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जाईल. तो ५ लाख रूपयापेक्षा जास्त नसावा. खर्चासाठी उमेदवार व त्याच्या पक्षाला बँकेत स्वतंत्र खाते सुरू करावे लागेल व त्यातूनच खर्च करता येईल. पक्षाने त्यांचा एकत्रित खर्च निवडणूक झाल्यावर एका महिन्यात सादर करायचा आहे. उमेदवाराने त्याचा खर्च रोजच्या रोज आयोगाकडे द्यायचा आहे. समर्थकांच्या खर्चाची नोंदही त्याने केली पाहिजे. ’’
ते म्हणाले, ‘‘उमेदवारी अर्ज आॅनलाइनच करावा लागेल. मात्र, त्या अर्जाची प्रत निवडणूक कार्यालयाकडे विहित मुदतीत वेळेत आणून द्यावा लागेल. प्रचार सभा कुठे घ्यायच्या, पोस्टर्स, बॅनर कुठे लावायचे त्याची यादी तयार आहे. पक्ष व उमेदवारांनाही त्यांना माहिती असणारी ठिकाणे सुचवायला सांगण्यात आले आहे. ती नावे आली की यादी जाहीर केली जाईल.’’ राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना आयोगाच्या सर्व सूचना तसेच नियम, कायदे यांची माहिती देण्यात आली आहे. आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. (प्रतिनिधी)