जात ही बोगस गोष्ट : डॉ. कुमार सप्तर्षी; ‘मातंग चळवळीचा इतिहास’वर परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:17 PM2018-02-12T13:17:23+5:302018-02-12T13:23:57+5:30
मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जात असल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. ‘मातंग चळवळीचा इतिहास’ महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदावेळी ते बोलत होते.
पुणे : आज जातीय अस्मिता या विचारधारेच्या अस्मितेपेक्षा तीव्र होताना दिसत आहेत. जात ही माणसाला वक्र दृष्टीकडे नेते , त्यामुळे जात ही बोगस गोष्ट आहे. मातंग समाजामधील जुन्या चालीरीती धरून चालत असल्यामुळे समाज मागे जात असल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली.
क्रांतिगुरू लहुजी महासंघाच्या वतीने पुणे शहरच्या वतीने ‘मातंग चळवळीचा इतिहास’ महाराष्ट्र शासनाच्या दलित साहित्यातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ या विषयावर परिसवांदावेळी ते बोलत होते. टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उद्घाटन युवक क्रांती दलाचे समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षीं, कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ, औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा.डॉ. सुरेश चौथाईवाले, दलित स्वयंसेवक संघाचे प्रमुख दादासाहेब सोनवणे, दलित युवक आंदोलनाचे अध्यक्ष सचिन बगाडे, लेखक व दिग्दर्शक सुरेश पाटोळे, अशोक लोखंडे, रवी आरडे, विकास सातारकर, भास्कर नेटके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत एकनाथ चांदणे यांनी केले. सूत्रसंचालन आतिष कापसे यांनी, तर आभार शैलेश आवळे यांनी मानले.
आंदोलनात किंवा राजकारणात जातीची गरज नको तेवढी वाढलेली आहे. कोणी जन्माअगोदर जात ठरवून जन्म घेत नाही . त्यामुळे माणसाला जोडणारा माणुसकी धर्म महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी घराबाहेर भारतीय म्हणून राहिले पाहिजे.
- डॉ. कुमार सप्तर्षी
दलित समाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा मातंग समाज, मातंग समाजाला ज्ञानाची परंपरा आहे. मातंग समाजाला खोटा इतिहास सांगून समाजाची फसवणूक आजपर्यंत करण्यात आली आहे, त्यासाठी मातंग समाजाचा खरा इतिहास लिहावा लागणार आहे.
- सचिन बगाडे