नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राची प्रकरणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:54 AM2018-05-08T03:54:52+5:302018-05-08T03:54:52+5:30
महापालिका निवडणूक होऊन वर्ष उलटून गेले, तरीही नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राच्या विरोधात दाखल झालेली प्रकरणे न्यायालयात सुरूच आहेत. नुकत्याच लागलेल्या निकालात हरिदास चरवड यांचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले, तर कविता वैरागे यांचा मुदतीत प्रमाणपत्र सादर करण्याचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयातच गेला.
पुणे - महापालिका निवडणूक होऊन वर्ष उलटून गेले, तरीही नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राच्या विरोधात दाखल झालेली प्रकरणे न्यायालयात सुरूच आहेत. नुकत्याच लागलेल्या निकालात हरिदास चरवड यांचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले, तर कविता वैरागे यांचा मुदतीत प्रमाणपत्र सादर करण्याचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयातच गेला.
चरवड यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी अक्रुर कुदळे यांनी त्यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा दाखल केला होता. त्याच्या सुनावणीत न्यायालयाने चरवड यांनी प्रमाणपत्र मिळावे म्हणून सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करावी व निर्णय घ्यावा, असे आदेश जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले होते. समितीने त्याप्रमाणे सर्व पुराव्यांची तपासणी केली व ते प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला. तो आता न्यायालयात सादर करण्यात येईल, असे चरवड यांनी सांगितले.
दुसऱ्या एका प्रकरणात नगरसेविका कविता वैरागे यांनी आपले प्रमाणपत्र निवडणूक झाल्यानंतर, ६ महिन्यांत सादर न करता ६ महिने होऊन गेल्यानंतर, २ दिवसांनी सादर केले होते. समितीकडून आपल्याला प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात आपल्यावर कसलीही कारवाई करू नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शर्वरी गोतारणे यांनी या प्रकरणात आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे, असा अर्ज न्यायालयात केला होता.
या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने वैरागे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. तिथे या प्रकरणासारखीच काही प्रकरणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना विलंबाने प्रमाणपत्र दाखल केलेल्या नगरसेवकांवर कसलीही कारवाई करायला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयापेक्षा ते वरिष्ठ न्यायालय असल्यामुळे वैरागे यांच्या प्रकरणात येथे निकाल देणे योग्य नाही. त्यांनी येत्या आठ आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल करावा व अन्य प्रकरणांप्रमाणेच स्थगिती आदेश मिळवावा अथवा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे सांगत उच्च न्यायालयाने वैरागे यांची आपणावर कारवाई करू नये, म्हणून दाखल केलेली याचिका फेटाळली.
वैरागे व चरवड हे दोन्ही नगरसेवक महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचेच आहेत. वैरागे प्रभाग क्रमांक २८ अ चे प्रतिनिधित्व करतात, तर चरवड प्रभाग क्रमांक ३३ अ मधून निवडून आले आहेत. याआधीही भाजपा, राष्ट्रवादी,तसेच काँग्रेसच्याही काही उमेदवारांचे नगरसेवकपद रद्द झाले आहेत, तर काहींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.