Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 01:18 PM2024-11-10T13:18:15+5:302024-11-10T13:18:37+5:30

युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते, हा तर राजकारणाचा खेळ

Caste hatred started after the birth of NCP; Raj Thackeray criticizes Sharad Pawar | Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

पुणे: आधी मराठा, ब्राह्मण वाद लावला. मग भांडारकर फोडले. जेम्स लेन कुणी वाचला पण नसेल... हे पुस्तक बंद करा हे पहिल्यांदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. पण त्यांना वाईट ठरविण्यात आले. हे सगळे शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकारण आहे. हा सगळा जातीचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर सुरू झाला आहे, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारार्थ कोथरूडमधील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते.

जरांगे पाटील यांची आरक्षण मागणी तांत्रिकदृष्ट्या निरर्थक 

मनाेज जरांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी तांत्रिकदृष्ट्या होऊ शकणार नाही. तुम्हाला राजकारणी चुकीचे सांगत आहेत. त्यासाठी नवा कायदा करावा लागेल. ही केवळ महाराष्ट्रापुरते राहणार नाही तर उद्या इतर राज्ये उठतील आणि मागणी करतील. मागणी करताना ते पूर्ण करतील का? हे पाहायला हवे. केवळ स्वतःच्या राजकारणासाठी तुमच्यात भांडणे लावली जात आहेत. हा साधुसंतांचा महाराष्ट्र, फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तोच महाराष्ट्र आज चाचपडत आहे. निवडून येण्यासाठी जात वापरतात आणि मग निवडून आल्यावर दुसरी जात बघतात. राष्ट्रवादी काँग्रेसने यात भर घातली, असेही ठाकरे म्हणाले. आरक्षण हे सगळे शिक्षण नोकऱ्यासाठी मागत आहेत. आता सरकारी नोकऱ्याच संपल्या आहेत. भरती होत नाही. मग आपण कुठल्या आरक्षणाच्या गोष्टी करत आहोत. कुठून आरक्षणातून नोकऱ्या मिळणार आहेत? ही लोक फक्त तुमच्यात आग लावत आहेत. आम्ही रोजगार, वीज, नोकऱ्या देऊ यावरच ५२ सालापासून निवडणुका होताहेत. यात काही बदल झालेला नाही, असेही ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील मतांचा अपमान

महाराष्ट्रातल्या मतांचा आज अपमान झाला आहे. शिवसेना भाजप पूर्ण बहुमतात होती. त्यानंतर अचानक पहाटेचा शपथविधी झाला आणि तो मोडला. इतकी वर्षे युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते आणि म्हणे मी मुख्यमंत्री. ही तुमच्या मतांची प्रतारणा नव्हे का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. हे सगळे हसण्यावरी नेताय. तो मतदारांच्या अस्तित्वाचा अपमान आहे. आपण राजकारण खेळ समजतोय. दुधाचे भाव, विजेचे भाव राजकारणी ठरवतात. कुणी कुणाबरोबर जाते. कारण तुम्ही राजकारण हसण्यावरी नेत आहात. हा विनोदाचा नव्हे तर गंभीर विषय आहे. नेत्यांच्या पापांवर पांघरून घालायचे का? तर हा आमचा जातीचा आहे. अशाने सगळे बरबाद होऊन जाईल. आपण महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

Web Title: Caste hatred started after the birth of NCP; Raj Thackeray criticizes Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.