जातीअंताची क्रांती रस्त्यावर उतरूनच - जिग्नेश मेवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 09:43 PM2017-12-31T21:43:18+5:302017-12-31T21:43:32+5:30
आता देशात जाती अंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल.
पुणे : आता देशात जाती अंताची नवी क्रांती संसदेत घडणार नाही, तर जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरूनच होईल. ही लढाई नवी पेशवाई संपवेल. पेशवाई हटविण्यासाठी कोणत्याही जाती-धर्माचा, पक्षाचा, विचारधारेचा, गटा-तटाचा विचार न करता एकत्रित येवून लढा उभारला तर २०१९ मधील महासंग्रामात नरेंद्र मोदी यांना घरी बसवु, असा इशारा गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी दिला.
भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला २०० वर्ष पुर्ण होत असल्यानिमित्त आयोजित एल्गार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, आरएसएसवर जोरदार हल्ला चढविला. भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. ते म्हणाले, एल्गार परिषदेत सहभागी होवू नये, अशी भीती काही संघटनांकडून घातली जात होती. पण त्यांना सांगु इच्छितो की, मी तुमच्या मोदी व शहांना घाबरलो नाही, तुम्ही तर अजून बच्चे आहात. ५६ इंची छाती फाडून इथे आलोय. मी आमदार बनलो असलो तरी केवळ दोन टक्के राजकारणी असून ९८ टक्के आंदोलनकर्ता आहे.
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना कर्मयोगी या पुस्तकात त्यांनी सफाई कर्मचाºयांना त्यांच्या कामातून अध्यात्मिक आनंद मिळतो, असे लिहिले आहे. हीच नवी पेशवाई आहे. मोदींनी या गटारात उतरून दाखवावे, तेव्हा त्यांना कळेल अध्यात्मिक आनंद काय असतो. दलित, आदिवासी, महिला, तरुण आपली गाºहाणी त्यांच्यासमोर मांडत असताना ते घरवापसी, लव्ह जिहाद, गोमाता यावर चर्चा करतात. गुजरातमध्ये १५० जागांचा अहंकार ९९ पर्यंत खाली आणला. केवळ ब्राम्हणच नाहीत तर मुकेश व अनिल अंबानी, गौतम अदानी ही ब्राम्हणवादी ताकद त्यांच्यासोबत आहे. पेशवाई समजून घ्यायचे असेल तर गुजरात मॉडेल समजायला हवे. तिथे मी या मॉडेलचा भांडाफोड केला आहे. गुजरातमध्ये हिंदु-मुस्लिम तसेच इतरांना एकमेकांविरोधात लढविण्याचे षडयंत्र केले जाते. मागील २२ वर्ष मोदींनी हेच केले. गरीब जनता जाती-धर्मात विभागल्यानंतर त्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्यात आल्या. त्यांच्याविरोधात उभ्या राहिल्यानंतर रोहितसारखी हत्या केली जाते. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतील निवडणुकांमध्ये कोणता पक्ष जिंकेल याच्याशी देणेघेणे नाही. पण भाजपा हरली पाहिजे, असे मेवाणी यांनी नमुद केले.
------------------
संघ समाप्ती संमेलन घेवु
येत्या १४ एप्रिल रोजी मी अहमदाबादमध्ये नसेल तर नागपुरमध्ये येवून संघ समाप्ती संमेलन घेवु. लोकशाही संपवून संविधान बदलण्याची त्यांची इच्छा असल्याचे हेगडे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्यांचा हा डाव आधीपासूनच आहे. हिंमत असेल तर संविधान बदलून दाखवाच २०१९ मध्ये मोदींना घरी बसवून संविधान वाचवु.
-------------------
कुठेही जा पण जा...
नरेंद्र मोदी यांनी हिमालयात जावे, या जिग्नेश मेवाणी यांच्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. त्याचा पुर्नरुच्चार मेवाणी यांनी यावेळीही केला. ते म्हणाले, त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता वैतागली आहे. केवळ जुमलेबाजी असते. त्यामुळे त्यांनी आता हिमालयात, नैनिताल कुठेही जावे. जागा त्यांनी निवडावी. तसेच निवडणुकीत त्यांनी राम विरूध्द ‘हज’ असे चित्र रंगविले होते. मोदींच्या डोक्यातील ही घाण संपविण्यासाठी त्यांच्या डोक्यात स्वच्छता अभियान राबवायला हवे, अशी खोचक टीका मेवाणी यांनी केली.