खरिपातील नुकसानीचा आकडा ९४ लाख हेक्टरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:44 AM2019-11-20T02:44:21+5:302019-11-20T02:44:27+5:30
पिकांच्या उत्पादकतेमध्ये होणार घट
पुणे : अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यातील खरिपाच्या तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे. तसेच, शेतात पाणी साचून राहिल्याने जवळपास सर्वच खरीप पिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होणार असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भात, ऊस, फळे आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
राज्यात ऊस पिकासह सरासरी खरीप क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, १३९.८८ लाख हेक्टरवरील (९३ टक्के) पेरणी-लागवडीची कामे सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत झाली होती. राज्यात आॅक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी होती. अनेक ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. आॅक्टोबरमध्ये देखील पावसाची हजेरी होती. लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात, मका, तूर, हळद, भुईमूग, नाचणी, संत्रा, लिंबू, डाळिंब, पपई, द्राक्ष, ऊस आणि भाजीपाला अशा विविध पिकांचा समावेश आहे.
पाणी साचल्याने पिकांवर परिणाम
सध्या भात व नाचणी पिकांची काढणी सुरु असून, भुईमूग पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक बोंड उमलण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणच्या वेचणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तूरही शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांवर विपरित परिणाम झाला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.