आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा; पुणे पोलिसांची पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अनोखी योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 09:34 AM2023-02-02T09:34:47+5:302023-02-02T09:36:38+5:30
कोयता गँगच्या गुंडांनी तर धुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे...
पुणे/किरण शिंदे : मागील काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कोयता गँगच्या गुंडांनी तर धुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र यात पोलिसांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता एक अनोखी योजना सुरू केली आहे. गुंडांना पकडा आणि बक्षीस मिळवा अशी ही योजना आहे.
1) शस्त्र अधिनियम कलम 3, 25 नुसार कारवाई केल्यास 10 हजार रुपये बक्षीस
2) शस्त्र अधिनियम कलम 4, 25 नुसार कारवाई केल्यास 3 हजार रुपये बक्षीस
3) फरार आरोपीला पकडल्यास 10 हजार रुपये बक्षीस
4) पाहिजे आरोपीला पकडल्यास 5 हजार रुपये बक्षीस
5) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि. मोका कारवाई केल्यास 5 हजार रुपये बक्षीस
6) महा. धोकादायक व्यक्ती इ. चे विघातक कृत्यांना आळा घालणाऱ्या 5 हजार रुपये बक्षीस
7) महा पोलीस कायदा कलम 55 नुसार कारवाई केल्यास दोन हजार रुपये
8) महा पोलीस कायदा कलम 56/57 नुसार कारवाई केल्यास 1 हजार रुपये बक्षीस
पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी कारवाई केल्यास वरील प्रकारची बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे.