भुकेल्या भटक्या कुत्र्यांसाठी खानावळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:49+5:302021-07-20T04:08:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारी निर्बंधाने खरकटे अन्न रस्त्यावर येत नसल्याने भटक्या कुत्र्यांची उपासमार होते. ते पाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारी निर्बंधाने खरकटे अन्न रस्त्यावर येत नसल्याने भटक्या कुत्र्यांची उपासमार होते. ते पाहून काही युवकांनी त्यांच्यासाठी खाणे तयार करण्याचा संकल्प सोडला. अल्पावधीतच याला संघटीत स्वरूप आले असून कुत्र्यांसाठीची खानावळ आता सहकारनगरमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.
पुणे अॅनिमल्स, सहकारनगर असा एक ग्रुप यातून तयार झाला आहे. परिसरातील सर्व भटक्या, अनाथ प्राण्यांच्या दोन वेळच्या खाण्याची व्यवस्था ते करतात. तांदळाची पेज व चिकनचे सूप ते दररोज सर्व कुत्र्यांना देतात. त्यासाठीचा रोजचा अडीच हजार रुपयांचा खर्च हे युवक एकमेकांच्या खिशातून भागवतात.
सहकारनगर, तळजाईपासून वाळवेकरनगर, टिळक रस्त्यापर्यंत दररोज अंदाजे दीड हजार भटक्या कुत्र्या-मांजरांची भूक त्यातून भागते. अनिकेत सातव व अन्य २५ जण एकत्रितपणे हे काम गेले वर्षभर स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून करत आहेत. अपघातात सापडलेल्या आजारी प्राण्यांना वैद्यकीय मदत पुरवणे, त्यांना बरे करणे, त्यांची नसबंदी ही कामेही आता हे तरुण करतात.
अनाथ लहान पिल्ले, सोडून दिलेली जनावरे यांच्यासाठी त्यांनी दत्तक योजना सुरू केली आहे. भूतदयेने भारावलेल्या या मुलांंना मदत करायची इच्छा असेल तर सहकारनगरमध्ये संपर्क साधा. रस्त्यावर कुठे ना कुठे या ‘अॅनिमल ग्रुप’चा एक तरी सदस्य तुम्हाला नक्की दिसेल.