पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले; मुंढवा पोलिसांची कामगिरी
By नितीश गोवंडे | Published: February 9, 2024 04:49 PM2024-02-09T16:49:30+5:302024-02-09T16:50:34+5:30
आरोपींकडून कोयता, तलवार, रॉड,मिरची पूड, दोरी, गज अशी शस्त्रे जप्त करण्यात आली
पुणे : मुंढवा भागातील केशवनगर भागात पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता आणि तलवार अशी शस्त्रे जप्त करण्यात आली.
कुलदीप उर्फ कुणाल संजय साळुंखे (१९), हर्षवर्धन उर्फ लकी मोहन रेड्डी (१९), तेजस उर्फ सनी अश्विन पिल्ले (२०, तिघे रा. केशवनगर, मुंढवा), शशांक श्रीकांत नागवेकर (२०, रा. सुशील सिद्धी सोसायटी, केशवननगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्या बरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चारही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास सुतार आणि तपास पथकातील अंमलदार हे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत होते, यावेळी अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला अंधारात काही मुले थांबली असून काही तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. यावेळी ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून रेड्डी, साळुंखे, पिल्ले, नागवेकर यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता लोणकर पेट्रोल पंपावर उशिरा रात्री लोकांची ये-जा कमी झाल्यावर पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली रक्कम लुटून घेऊन जाण्याची त्यांची तयारी होती. त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार अंधारात फायदा घेऊन पसार झाले. चौघांकडून कोयता, तलवार, रॉड,मिरची पूड, दोरी, गज अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार, संदीप जोरे, पोलिस उपनिरीक्षक धनंजय गाडे, पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे यांच्या पथकाने केली.