तलाठी इंदापूर तालुक्यातील पळसदेवचा अन् लाच घेताना पकडले पुण्यात ; भरपावसात बस स्टॉपवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:34 PM2021-06-17T21:34:35+5:302021-06-17T21:37:08+5:30
वारसांची नोंद घेऊन सात बारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड याने १० हजार रुपयांची लाच मागितली....
पुणे : वारसांची नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी ८ हजारांची लाच मागणार्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील तलाठ्याला पौड रोडवरील नळस्टॉप येथे खासगी व्यक्तीमार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पौड रोडवरील आयडियल कॉलनी समोरील बसस्टॉपवर सापळा रचून भरपावसात ही कारवाई केली.
तलाठी राजेश उत्तम गायकवाड (वय ४०), संग्राम नथु भगत (वय ४१) अशी दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिला वकिलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या आशिलाच्या वारसांची नोंद घेऊन सात बारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड याने १० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार वकिलांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची आज पडताळणी केली. तेव्हा त्याने तडजोडीअंती ८ हजार रुपयांची मागणी करुन ती खासगी व्यक्ती संग्राम भगत यांच्याकरवी स्वीकारताना सापळा रचून पकडण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.
.......
जमीन इंदापूरात कारवाई पुण्यात
या कारवाईतील जमीन ही इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात आहे. तक्रारदार महिला वकिल आणि त्यांचे आशिल हे पुण्याचे रहिवासी आहेत. तसेच गायकवाड यांचा भाऊ पुण्यात राहतो. त्याच्याकडे गायकवाड आले होते. त्यामुळे लाचेची रक्कम पुण्यात देण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड याने पौड रोडवरील आयडियल कॉलनीसमोरील बसस्टॉपजवळ पैसे घेऊन येण्यास व संग्राम भगतकडे देण्यास सांगितले. त्यानुसार या तक्रारदार सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तेथे पोहचल्या. त्यावेळी पाऊस सुरु होता. तरीही भररस्त्यात सापळा लावण्यात आला होता. तक्रारदाराकडून संग्राम भगत याने पैसे स्वीकारताच त्याला पकडण्यात आले. त्याबरोबर तलाठी गायकवाडलाही लगेचच ताब्यात घेण्यात आले.