गोठ्यात आलेला विषारी नाग पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:49+5:302021-09-24T04:13:49+5:30
पिंपळगाव खडकीमधील साखरेमळा वस्तीवरील ज्ञानेश्वर खंडूजी पोखरकर यांच्या गोठ्यात साप आढळला. सापाला पाहून सगळ्यांची घबराट उडाली. ही माहिती साहिल ...
पिंपळगाव खडकीमधील साखरेमळा वस्तीवरील ज्ञानेश्वर खंडूजी पोखरकर यांच्या गोठ्यात साप आढळला. सापाला पाहून सगळ्यांची घबराट उडाली. ही माहिती साहिल अरविंद पोखरकर यांनी पिंपळगाव खडकीचे विद्यमान सरपंच आणि सर्पमित्र दीपक पोखरकर यांना दिली. माहिती मिळाल्यावर सरपंच लगेच घटनास्थळी उपस्थित झाले. सापाची पाहणी केली असता साप हा नाग असून विषारी असल्याचे लक्षात आले. हा साप अडगळीत बसला होता. त्या सापाला पकडून सुरक्षितस्थानी सोडणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्यावर सरपंच पोखरकर यांनी नागाला पकडण्यासाठी सुरुवात केली. साप पकडण्यासाठी लागणारा विशिष्ट प्रकारचा हुक असलेलेली काठी उपलब्ध नसल्यामुळे एक साधी काठी घेऊन तिच्या साहाय्याने सापाला पकडण्यास सुरुवात केली. सुमारे पंधरा मिनिटांच्या मेहनतीने मोठ्या शिताफीने सरपंच पोखरकर यांनी या नागाला एका बरणीमध्ये बंद केले. वनविभागाशी संपर्क करण्यात आला. वनरक्षक मोमीन यांच्या सल्ल्यानुसार विषारी नागाला जंगल निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून साप दिसल्यावर लगेच काठी घेऊन मारण्यापेक्षा सर्पमित्राला बोलावून त्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडले पाहिजे, असे यावेळी सर्पमित्र सरपंच दीपक पोखरकर यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक - २३मंचर विषारी नाग पकडला
फोटोखाली : पिंपळगाव खडकी येथे सरपंच दीपक पोखरकर यांनी विषारी सापाला पकडून निसर्ग सान्निध्यात सोडून दिले.