आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई
By नितीश गोवंडे | Updated: June 9, 2023 16:49 IST2023-06-09T16:49:23+5:302023-06-09T16:49:31+5:30
महामार्गालगत असलेल्या एका जमिनीबाबत हा व्यवहार सुरू असताना अनिल रामोड यांनी पैसे स्विकारताना त्यांना सीबीआयने पकडले

आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई
पुणे : शहरातील महसूल खात्यातील भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने छापे टाकले आहेत. ८ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने ही धाड टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. महामार्गालगत असलेल्या एका जमिनीबाबत हा व्यवहार सुरू असताना, रामोड यांनी पैसे स्विकारताना त्यांना सीबीआयने पकडले. महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली.
सीबीआयच्या पथकाने पुण्यातील कॅम्प परिसरातील लष्कर भागातील शासकीय वसाहतीत ही कारवाई केली. शासकीय वसाहतीत राहणाऱ्या महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापा टाकून कारवाई करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहेत. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात देखील सीबीआय अधिकारी दाखल होऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे. सीबीआयच्या पथकाकडून महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.