‘ओशो आश्रम’ कारस्थानाची सीबीआय चौकशी हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:00+5:302021-08-13T04:14:00+5:30
पुणे : ओशो आश्रम भारतातून परदेशात हलविण्याचा घाट घातला जात आहे. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा नसून, संपूर्ण जगाचा ...
पुणे : ओशो आश्रम भारतातून परदेशात हलविण्याचा घाट घातला जात आहे. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा नसून, संपूर्ण जगाचा वारसा आहे. मात्र, ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असून, सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी स्वामी गोपाळभारती आणि स्वामी झोरबा (ओशो संन्यासी) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, ओशो फाउंडेशन इंटरनॅशनल आणि नवसंन्यास (रजनीश) फाउंडेशनचे ट्रस्टी आणि वर्तमान प्रबंधन टीमद्वारे १८०० कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. ओशो संन्यासींना समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे. ओशोंना एक रहस्यदर्शी सद्गुरू न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे.
येणाऱ्या पिढ्यांनी ओशोंना विसरून जावे यासाठी हे कारस्थान रचले जात आहे. ओशोंची जगभरातील वेगवेगळ्या ६० ते ७० भाषांमध्ये अनुवादित झालेल्या ग्रंथसंपदेची ‘रॉयल्टी’ कुठे जात आहे? याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विकण्यापासून वाचविण्याची नाही, तर या सर्व प्रकाराची सीबीआय व ईडीमार्फत सखोल चौकशी व्हावयास हवी. यासंदर्भात अनेक संन्याश्यांनी धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.