CBSE Result: गतवर्षीच्या तुलनेत सीबीएसईचा बारावी आणि दहावीचा निकाल घटला; यंदा मुलींची बाजी
By नम्रता फडणीस | Published: May 12, 2023 07:01 PM2023-05-12T19:01:51+5:302023-05-12T19:02:07+5:30
यंदा बारावीचा निकाल 87.33 टक्के तर दहावीचा निकाल 93.12 टक्के
पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) बारावी आणि दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, गतवर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 6 टक्क्यांनी तर दहावीचा निकाल दीड टक्क्यांनी घटला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे बारावी आणि दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींचेच उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. यंदा बारावीचा निकाल 87.33 टक्के तर दहावीचा निकाल 93.12 टक्के लागला आहे.
सीबीएसईने 15 फेब्रृवारी ते 5 एप्रिल या कालावधीत इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. देशभरातील 16 हजार 728 शाळेतील 16 लाख 80 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 60 हजार 511 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 14 लाख 50 हजार 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बारावीच्या निकालात 5.38 टक्क्यांनी घट झाली आहे. गतवर्षी सीबीएसईचा निकाल 92.71 टक्के लागला होता. यंदा बारावीच्या परीक्षेत 90.68 टक्के मुली आणि 84.67 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. बारावीचा संपूर्ण पुणे विभागाचा निकाल 87.27 टक्के लागला आहे.
दहावीचा पुणे विभागाचा निकाल 96.12 टक्के
सीबीएसईने 15 फेबृवारी ते 21 मार्च दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. यंदा देशभरातील 24 हजार 480 शाळांमधील 21 लाख 84 हजार 111 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामधील 21 लाख 16 हजार 779 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 20 लाख 16 हजार 779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा दहावीचा निकालात गतवर्षीच्या तुलनेत 1.28 टक्क्यांनी घट झाली. गतवर्षी दहावीचा निकाल 94.40 टक्के लागला होता. तसेच यंदा 94.25 टक्के मुली तर 92.27 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल हा 1.98 टक्क्यांनी अधिक आहे. यंदा 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 9.4 टक्के तर 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे 2.05 टक्के इतके आहे.