वेल्ह्यातील गावागावांत बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Published: May 1, 2017 02:15 AM2017-05-01T02:15:43+5:302017-05-01T02:15:43+5:30
वेल्हे तालुक्यातील प्रत्येक गावात सीसीटीव्ही बसविणार असल्याची माहिती वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील प्रत्येक गावात सीसीटीव्ही बसविणार असल्याची माहिती वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. गोपाळ यांनी सांगितले.
सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. गोपाळ म्हणाले, की यांसदर्भात नुकतीच वेल्हे पंचायत समितीमध्ये तालुक्यातील ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी सुरू केलेली एक गाव एक सीसीटीव्ही कॅमेरा योजना ही वेल्हे तालुक्यातदेखील राबविली जाणार असून पुणे जिल्ह्यात १,३६५ ग्रामपंचायती असून त्यापैकी १,२६२ गावांना तंटामुक्त गाव योजनेअंतर्गत एकूण ३१.७३ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. तर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा चौदाव्या वित्तआयोगातून भरीव निधी प्राप्त झाला आहे. परंतु तो निधी खर्च करण्यासाठीचे निकष देण्यात आले असल्याने तो निधी वापरता येत नाही; त्यासाठी जिल्हा परिषदेकडूनपरवानगी गरजेची आहे. १ मे रोजी ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्याचे आदेश गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी दिले आहेत. वेल्हे तालुक्यातील मार्गासनी, विंझर, अंबवणे, पाबे आणि वेल्हे या गावांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या बैठकीस सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. गोपाळ, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, सरपंच भीमराव देवगिरीकर, गुंजवणीचे पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, पोलीस हवालदार गणेश लडकत, रमेश शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)