नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:02 PM2019-08-22T13:02:17+5:302019-08-22T13:02:59+5:30
गेल्या काही वर्षांत पुणे शहर पोलिसांमार्फत शहरातील बहुतेक सर्व प्रमुख चौक आणि प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
पुणे : शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. परंतु पुणे शहर पोलिसांकडे यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नाही. यामुळे महापालिकेच्या वतीने प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून २ लाख असे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. शहर पोलिसांनी महापालिकेला निधीची मागणी करणारे लेखी पत्र दिले आहे.
गेल्या काही वर्षांत पुणे शहर पोलिसांमार्फत शहरातील बहुतेक सर्व प्रमुख चौक आणि प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु अद्यापही शहरातील फार मोठा भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आलेला नाही. यामुळेच सुरक्षितेच्या दृष्टीने संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून, महापालिकेने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने सर्व नगरसेवकांना
विनंती केली असून, प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी किमान प्रत्येकी २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.
......
किती कॅमेरे लागणार, याची माहिती घेण्याचे काम सुरू
याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले की, महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवामध्ये सर्व घाट परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॅमेरे बसविले जातात. परंतु संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नेटवर्क उभे करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक नगरसेवकाकडून २ लाख रुपयांचा निधी घेण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांकडून कोणत्या परिसरामध्ये किती कॅमेरे बसविण्याची गरज आहे, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात येईल, असे कंदुल यांनी स्पष्ट केले.