शहरातील उद्यानांवर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: March 30, 2016 02:09 AM2016-03-30T02:09:21+5:302016-03-30T02:09:21+5:30
शहरातील ६३ चौकांसह महापालिकेच्या उद्यानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात येणार आहेत. ३३७ कॅमेरे बसविण्यासाठी सव्वासात कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
पिंपरी : शहरातील ६३ चौकांसह महापालिकेच्या उद्यानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात येणार आहेत. ३३७ कॅमेरे बसविण्यासाठी सव्वासात कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात या कामासाठी १७ निविदा काढण्यात आल्या आहेत. ६३ चौकांमध्ये एकूण ३३७ कॅमेरे, तसेच पालिकेच्या साई उद्यान, बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, बर्ड व्हॅली या उद्यानातही कॅमेरे उभारणार आहेत. त्याची एकत्रित किंमत ७ कोटी २६ लाख इतकी आहे. ठेकेदारास यंत्रणा उभारून ५ वर्षे देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. सुमारे ६० ते ९० दिवसांचे रेकॉर्डिंग या यंत्रणेत राहणार आहे. पालिकेच्या दूरसंचार विभागाने तांत्रिक परिमाण निश्चित करून सर्व्हे, डिझाईन व उभारणी केली आहे.
विविध चौकांतील सीसीटीव्ही यंत्रणा टेहळणीसाठी पोलीस ठाणे, चौकींमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. महापालिकेच्या उद्यानांमधील कॅमेऱ्यांची टेहळणी महापालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत करण्यात येणार आहे. आपत्ती कालावधीत आवश्यकतेनुसार पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातूनही टेहळणी करण्याची सुविधा या कॅमेऱ्यांमध्ये आहे. या यंत्रणेसाठी पालिका ५७ किमी फायबर आॅप्टिक केबल टाकणार आहे.(प्रतिनिधी)