सीसीटीव्हीमुळे गुन्हेगार जाळ्यात! ५० टक्के गुन्हे उघडकीस येण्यास होतेय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:52 AM2022-09-28T10:52:19+5:302022-09-28T10:54:54+5:30

एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न उघड..

CCTV is helping to uncover 50 percent of crimes pune city latest crime updates | सीसीटीव्हीमुळे गुन्हेगार जाळ्यात! ५० टक्के गुन्हे उघडकीस येण्यास होतेय मदत

सीसीटीव्हीमुळे गुन्हेगार जाळ्यात! ५० टक्के गुन्हे उघडकीस येण्यास होतेय मदत

Next

पुणे : गुन्ह्याची उकल करण्यामध्ये तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे पोलिसांकडून तपासादरम्यान सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, सीडीआर या गोष्टींवर भर दिला जात आहे. त्यात शहरातील चौकाचौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे रस्त्यावरील तसेच जवळपासच्या घटना, गुन्हे उघडकीस येण्यास सीसीटीव्हीचा महत्त्वाचा वाटा आहे. शहरातील जवळपास ५० टक्क्यांहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाचा पुरावा सीसीटीव्हीमुळे मिळत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात सीसीटीव्हीची नजर असलेले पुणे हे पहिले शहर ठरले आहे. पुण्यात १ हजार २३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यात आता नव्याने आणखी सीसीटीव्हीची भर पडणार आहे.

२८ हजार ६०० सीसीटीव्ही

पुणे शहर पोलिसांनी शासकीय सीसीटीव्हीव्यतिरिक्त खासगी संस्था, घरगुती कॅॅमेऱ्याचा एक ॲक्सेस जीओ टेक्निकद्वारे पोलीस नियंत्रण कक्षातील सर्व्हरशी जोडला जातो. एखाद्या परिसरात गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणचे सर्व शासकीय व खासगी सीसीटीव्हीची तपासणी करून गुन्हेगारांचा माग काढला जातो.

५० टक्के गुन्हे सीसीटीव्हीमुळे उघड

शहरातील अनेक खून, मंगळसूत्र चोरी, जबरी चोरी, फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचा पोलिसांना उपयोग होत आहे. ५० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यात आरोपीची ओळख पटविण्यात अथवा त्याचा माग काढण्यात या कॅमेऱ्यांचा उपयोग होत आहे. २०२१ मध्ये सीसीटीव्हींच्या माध्यमातून १२२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यात ३३६ आरोपींना अटक करण्यात आली होती.

ज्वेलर्सच्या दुकानातील चोरी उघड

पुण्यातील नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात हातचलाखी करून चोरी करणाऱ्या महिलेला रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत माग घेऊन पकडण्यात पोलिसांना यश आले होते. ज्वेलर्समधील काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगून त्यानंतर त्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून सोन्याच्या अंगठीऐवजी बनावट अंगठी ठेवत असे. दुकानात चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तिचा माग काढण्यात आला व तिला अटक केली गेली.

एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न उघड

काेंढवा परिसरात बँकेचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न करण्याचे गुन्हे घडत होते. सीसीटीव्ही सर्विलन्समुळे त्यांचा प्रयत्न फसला. कोंढवा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीवर नजर ठेवून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना रंगेहात पकडले.

सीसीटीव्ही आणि खबरे परस्परांना पूरक

सीसीटीव्हीमुळे ५० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात मदत होते. सीसीटीव्ही ही तांत्रिक मदत आहे. खबऱ्यांमुळे माणसाची माहिती, त्यांच्या वागणुकीत झालेले बदल व अन्य माहिती मिळते. दोघेही परस्पर पूरक आहेत.

- श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: CCTV is helping to uncover 50 percent of crimes pune city latest crime updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.