लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही
By admin | Published: April 12, 2017 04:14 AM2017-04-12T04:14:53+5:302017-04-12T04:14:53+5:30
पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. लोकलमधील महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय
पुणे : पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. लोकलमधील महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महिलांंच्या डब्यातील हालचालींवर आता रेल्वे पोलिसांची करडी नजर असेल.
लोणावळा लोकलच्या दररोज ४० तर पुणे-तळेगाव लोकलच्या ४ अशा दररोज एकूण ४४ फेऱ्या होतात. सुमारे सव्वा ते दीड लाख प्रवाशांना लोकलचा फायदा होतो. त्यामध्ये २० ते २५ हजार महिला प्रवाशांचा समावेश आहे. लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेडछाड, शिवीगाळ, पर्स, दागिने, मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडतात. याला आळा घालण्यासाठी महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सीसीटीव्ही खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून बसविले जाणार आहेत. सध्या लोकलमध्ये पहिला, शेवटचा आणि मधला डबा महिलांसाठी राखीव आहे. या डब्यात काही गोंधळ झाल्यास पुढच्या स्थानकावरील पोलीस मदतीला येतात. मात्र, डब्यात नेमका काय गोंधळ सुरू आहे, हे रेल्वे प्रशासन अथवा पोलिसांना कळत नाही. सीसीटीव्ही बसविल्यानंतर डब्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असेल. पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य) कृष्णाथ पाटील म्हणाले, पुणे-लोणावळा लोकलमध्ये महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी महिला डब्यांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविले जातील.