निर्भया फंडातून पीएमपीमध्ये सीसीटीव्ही
By admin | Published: October 2, 2015 01:11 AM2015-10-02T01:11:12+5:302015-10-02T01:11:12+5:30
पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच पीएमपीच्या प्रमुख मार्गांवरील बस मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे
पुणे : पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच पीएमपीच्या प्रमुख मार्गांवरील बस मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र शासनाच्या निर्भया फंडातून मागण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाकडून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.
शहरात पीएमपीने दररोज तब्बल १२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात ५० टक्क्यांहून अधिक महिलांची संख्या आहे. नोकरदार आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे; मात्र प्रवाशांच्या तुलनेत पीएमपीची संख्या कमी असल्याने या महिलांना छेडछाड, धक्काबुक्की, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
प्रत्येक बसमध्ये सुरक्षेसाठी पोलीसही नेमणे शक्य नसल्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालणे शक्य होत नाही, तर महिलांकडून पुन्हा प्रवास नको म्हणून या प्रकाराबाबत तक्रारही दिली जात नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महिलांसाठी पीएमपीचा प्रवास असुरक्षित बनत चालला आहे. तर, या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक बसमध्ये सुरक्षारक्षक नेमणे पीएमपीला शक्य नाही. त्यामुळे लवकरच प्रमुख मार्गांवरील बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
----------
सीसीटीव्हीसाठी निर्भया फंड
दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आल्याने केंद्र शासनाच्या २०१३-१४ च्या अंदाजपत्रकात महिलांच्या सुरक्षेसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्याला ‘निर्भया फंड’ असे नाव देण्यात आले आहे, तर या निधीत २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात १ हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे. प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी वापरला जाणार आहे. त्यानुसार, महिला सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पीएमपीकडून जिल्हा प्रशासनास पाठविण्यात येणार आहे. त्यात हा निधी निर्भया फंडातून द्यावा, अशी मागणी केली जाणार आहे.