नारायणगावावर सीसीटीव्ही वॉच
By admin | Published: May 3, 2017 01:45 AM2017-05-03T01:45:23+5:302017-05-03T01:45:23+5:30
वारूळवाडी व नारायणगाव शहर सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात आले आहे. गुन्हेगारी तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर आता
नारायणगाव : वारूळवाडी व नारायणगाव शहर सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात आले आहे. गुन्हेगारी तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर आता नारायणगाव पोलिसांची करडी नजर राहणार आहे़ दोनही शहरांतील प्रमुख भागांमध्ये एकूण २२ कॅमेरे बसविण्यात आले आहे. उर्वरीत भागात १५ कॅमेरे लावण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर यांनी दिली़
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या प्रेरणेतून वारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या सहभागातून तसेच रा़ प. सबनीस विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, नंदू शेटे, दिलीप कोठारी व इतर काही मान्यवरांच्या सहकार्याने २२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ पुढील काही दिवसांत कोल्हेमळा ग्रामीण रुग्णालय रोड, महावीर भवन रोड, जुन्नर रोड व उर्वरीत प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर त्याचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई व सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय. मुजावर यांच्या उपस्थितीत करण्यात आला़ या वेळी वारूळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे, नारायणगावचे माजी सरपंच संतोश वाजगे, बाबू पाटे, संजय वारूळे, ग्रा़ पं़ सदस्य रामदास अभंग, आरीफ आतार व ग्रामस्थ पोलीस अधिकारी उपस्थित होते़
सीसीटीव्हीमुळे संपूर्ण शहरातील घडामोडींवर नारायणगाव पोलिसांचे लक्ष राहणार आहे़ बेकायदेशीर कृत्य तसेच रोडरोमिओ, मंगळसूत्र चोर, भुरटे चोर यांच्यावर वचक ठेवणे शक्य होणार आहे. शहरात वारंवार होणारी वाहतूककोंडी यावरदेखील पोलिसांचे लक्ष राहील़ बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या तसेच बेशिस्तरित्या वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर त्वरित दंडात्मक कारवाई नारायणगाव पोलीस करणार आहेत़.(वार्ताहर)