रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर सीसीटीव्ही वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:08 PM2018-12-10T16:08:32+5:302018-12-10T16:19:03+5:30
रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्यांची ‘शी’ फुटपाथवर घाण, कचरा टाकणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
पुणे: शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्यांची ‘शी’ फुटपाथवर घाण, कचरा टाकणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. आता शहराच्या विविध भागात रस्त्यावर कचरा टाकणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये शहरातील अशा प्रकारचे रस्त्यांवर कचरा टाकणारे ४२७ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, येथे सीसीटीव्ही वॉच ठेवण्यात येणार आहे.
सध्या शहरामध्ये स्वच्छ भारत अभियाना अतंर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरु आहे. गेल्या एक महिन्यांपासून शहर स्वच्छ करण्यासाठी व पुण्याला या सर्वेक्षणात थ्री स्टार मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यावर कचरा टाकणा-यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामध्ये शहरात महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करू दिली आहे. परंतु कचरा गोळा करणा-या सेवकांना दर महा ५० ते ६० रुपये द्यावे लागतात म्हणून अनेक लोक कचरा रस्त्यावर टाकतात. तर शहरात प्रामुख्याने उपनगरांमध्ये शहराच्या हद्दी बाहेरील लोक कामासाठी शहरात येतात हा कचार टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये शिवणे, चंदननगर, खराडी, वारजे, सिंहगड रोड, आंबेगाव, आदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या शहरात रस्त्यावर कचरा टाकत असलेले ४२७ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी सकाळी व रात्रीच्या वेळी महापालिकेचे कर्मचारी देखील या भागात गस्त घालणार आहे. रस्त्यावर कचरा टाकणा-यांवर आॅन दि स्पॉट २०० रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.