‘सीसीटीव्ही’तून तपासणार ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:00+5:302021-09-03T04:11:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल केलेल्या विषयांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिती सदस्यांनी खरोखरच विरोध केला ...

CCTV will check the hypocrisy of NCP corporators | ‘सीसीटीव्ही’तून तपासणार ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा

‘सीसीटीव्ही’तून तपासणार ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल केलेल्या विषयांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिती सदस्यांनी खरोखरच विरोध केला की ते सदस्य खोटे बोलतात हेच आता स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले जाणार आहे. हे सदस्य खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले तर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत पक्षच विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार करणार आहे,” अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर केली. त्यानंतर ‘राष्ट्रवादी’तला पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

गुरुवारी (दि. २) महापालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. यावेळी ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि स्थायी समिती सदस्य नंदा लोणकर, बंडू गायकवाड उपस्थित होते. जगताप म्हणाले, “स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी दीपाली धुमाळ यांनी समिती सदस्यांना पक्षाच्या धोरणाबाबत माहिती दिली होती.” या वक्तव्यावर लोणकर यांनी आक्षेप घेत ‘आता आम्हालाही बोलायचे आहे’ असे म्हटले. “स्थायी समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी धुमाळ यांनी आमची बैठक घ्यायला हवी होती,” अशी टिप्पणी लोणकर यांनी केली.

लोणकर यांना प्रत्युत्तर देण्यास निघालेल्या धुमाळ यांच्यासह लोणकर यांना जगताप यांनी थांबवले. त्यामुळे पुढचा प्रसंग टळला. मात्र जाहीर पत्रकार परिषदेतच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये या ठिणग्या उडाल्याची चर्चा त्यानंतर महापालिकेत रंगली. “एखाद्या विषयात पक्षाकडून सूचना केली गेली नसली तरी, संबंधित बैठकीला जाण्यापूर्वी सदस्यांनी स्वत:हून माहिती घेणे आवश्यक आहे,” असेही जगताप यांनी यावेळी सुनावले. त्यामुळे आता जगताप ‘सीसीटीव्ही’तून कोणते सत्य शोधून काढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चौकट १

निर्णय अजित पवारच घेतील

दीपाली धुमाळ व नंदा लोणकर या नगरसेविकांना शांत केल्यानंतर जगताप यांनी नगरसचिवांकडून स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज मागविले असल्याचे सांगितले. बैठकीत खरोखरच गोंधळ झाला व घोषणाबाजीत ऐनवेळी दाखल झालेले विषय सत्ताधाऱ्यांनी मान्य करून घेतले की राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाच्या निर्णयात सहभागी होते हे तपासणार असल्याचे जगताप म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी समिती सदस्य अनेक वादग्रस्त विषयांवर सत्ताधारी भाजपाला वारंवार पाठींबा देतात याची माहिती अजित पवार यांना देणार आहे. त्यानंतर ‘स्थायी’तल्या ‘राष्ट्रवादी’च्या चार सदस्यांचे काय करायचे याचा निर्णय पवारच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: CCTV will check the hypocrisy of NCP corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.