नीरेतील सीसीटीव्हीचे काम लवकरच सुरू होईल : सुनील महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:03+5:302021-09-04T04:15:03+5:30
गुरुवारी सायंकाळी नीरा पोलीस दूरक्षेत्रात गणेशोत्सवाची बैठक पार पडली. दि. २३ ऑगस्ट रोजी लोकमतने ''नीरा गावात सीसीटीव्हीची अद्याप प्रतीक्षा.'' ...
गुरुवारी सायंकाळी नीरा पोलीस दूरक्षेत्रात गणेशोत्सवाची बैठक पार पडली. दि. २३ ऑगस्ट रोजी लोकमतने ''नीरा गावात सीसीटीव्हीची अद्याप प्रतीक्षा.'' ''तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी दिली होती लोकवर्गणी.'' या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीची दखल घेत महाडीक यांनी सीसीटीव्हीची लोकवर्गणी धायगुडे नामक ठेकेदाराकडे जमा असून त्याला विचारपूस केली आहे.
ठेकेदारच्या वैयक्तिक कारणांमुळे नीरा शहरात सीसीटीव्ही बसवण्यास विलंब झाला आहे. त्याकाळी ठरलेल्या रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम त्याला मिळाली आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम देणे बाकी आहे. पण सध्या सीसीटीव्ही तंत्रज्ञानात आधुनिकीकरण झाले आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे. या वाढीव रकमेचे व उर्वरित २५ टक्के रकमेसाठी पुन्हा गणेशोत्सव मंडळांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन महाडीक यांनी केले आहे.
नीरा पोलिस दूरक्षेत्रात २७ सप्टेंबर २०१७ रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सीसीटीव्ही बसवण्यासाठी लोकवर्गणी काढण्यात आली होती. ही वर्गणी तत्कालीन पोलीस निरीक्षकांकडे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी दिली होती. चार वर्षे होऊनही सीसीटीव्ही नीरा गावात न बसल्याची चर्चा दबक्या आवाजात नीरा गावात होती. या चर्चेची दखल घेत लोकमतने या घटनेला उजाळा दिल्याने नीरा पोलीस दूरक्षेत्रात झालेल्या बैठकीत लोकांनी बोलण्याआधीच पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या मुद्द्याचे स्पष्टीकरण दिल्याने लोकांनी लोकमतचे आभार मानले.
नीरा ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगतील ८ ते १० लक्ष रुपये सीसीटीव्हीसाठी आरक्षित रक्कम ठेवली आहे. या रकमेतून नीरेच्या प्रत्येक प्रभागातील गर्दीच्या व रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याव्यतिरिक्त प्रभागातील लोकांच्या हालचालींवर ग्रामपंचायत कार्यालयातून लक्ष ठेवले जाईल.
राजेश काकडे : उपसरपंच, नीरा