गावांवरही ‘सीसीटीव्ही’ची नजर

By admin | Published: May 7, 2017 02:39 AM2017-05-07T02:39:39+5:302017-05-07T02:39:39+5:30

खेडेगावांमध्ये पडणारे दरोडे, अपघात करून सुसाट पसार होणारे वाहनचालक यांना आता चाप लागण्याची शक्यता निर्माण झाली

CCTV's eye on the villages too | गावांवरही ‘सीसीटीव्ही’ची नजर

गावांवरही ‘सीसीटीव्ही’ची नजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खेडेगावांमध्ये पडणारे दरोडे, अपघात करून सुसाट पसार होणारे वाहनचालक यांना आता चाप लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण पोलीस दलही स्मार्ट होण्याचे प्रयत्न करत असून सर्व गावांमधील गजबजलेल्या चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा एक गाव एक सीसीटीव्ही हा प्रकल्प एक ते दोन महिन्यांमध्ये पूृर्ण करण्यात
येणार आहे.
या उपक्रमाद्वारे प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्हीचा वॉच राहणार असून राज्यातील पहिला सीसीटीव्हीयुक्त जिल्हा होण्याचा मान पुणे जिल्हा पटकाविण्याच्या तयारीत आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाची सूत्रे सुवेझ हक यांनी हाती घेतल्यापासून दलामध्ये बदल करण्याचे काही प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सीसीटीव्ही आणि दक्ष या ग्रामरक्षक दलाद्वारे ग्रामीण भागातील गैरप्रकारांना चाप बसवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार असून गस्तीमध्ये सामावून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
हक म्हणाले, मार्च ते मेदरम्यान गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे अभ्यासावरून दिसून आले आहे. ग्रामीण भागामध्ये पोलीस दलाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे नागरी सहभागातून नव्या योजना राबविण्याचा प्रयत्न आहे. गावातील सुरक्षेमध्ये ग्रामस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.
एक गाव एक सीसीटीव्ही हा प्रकल्प जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, सराफ व्यावसायिक यांच्या मदतीमधून राबविला जाणार आहे. गजबलेल्या चौकांमध्ये ४ कॅमेरे असलेला सीसीटीव्ही बसविला जाईल. त्याचा स्क्रिन ग्रामपंचायतीमध्ये असेल. अनेकांनी या प्रकल्पामध्ये मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. एकापेक्षा अधिक सीसीटीव्ही बसवायचे झाल्यास जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दिला जाईल.
या कॅमेऱ्यांचे जीपीएस मॅपिंग केले जाईल. ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या स्क्रिनवर सतत नजर असेल असे नाही. मात्र दुर्घटना झाल्यास चित्रीकरण पाहून त्याचा वापर पुरावा म्हणून केला जाऊ शकेल. प्रत्येक पोलीस ठाण्यात या कॅमेऱ्यांचे नियंत्रण करणारा जनसंपर्क अधिकारी नियुक्त केला जाणार आहे, असे हक यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील वाढत्या गुन्ह्यांचे व चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता ग्रामरक्षक दलाचा स्वयंसेवक आणि पोलीसपाटील यांना शस्त्र परवाने देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. शिवाय शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षणही देऊ. या दलांच्या अस्तित्वामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास हक यांनी व्यक्त केला.

‘दक्ष’ दल : २५ स्वयंसेवक सहभागी होणार

ंविश्वास नांगरे-पाटील पुणे ग्रामीण अधीक्षक असताना त्यांनी आखलेली ‘दक्ष’ ही ग्रामरक्षक दलाची योजना आता राबविली जाणार आहे. एका दक्ष दलामध्ये २५ स्वयंसेवक असतील. त्यांना लाठ्या, पोलीस बॅच, टोपी देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये पोलीसपाटीलही सहभागी होऊ शकतील. तंटामुक्तीसाठी असलेल्या निधीचा वापर या दलाच्या खर्चासाठी केला जाईल, असे हक यांनी सांगितले.

Web Title: CCTV's eye on the villages too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.