पेट्रोलच्या भावाने केले शतक साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:59+5:302021-02-23T04:15:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : इंधनाच्या भावामध्ये वाढ सुरूच असून शनिवारी (दि.२०) शहरातील पॉवर पेट्रोलने भावाची शंभरी पार केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : इंधनाच्या भावामध्ये वाढ सुरूच असून शनिवारी (दि.२०) शहरातील पॉवर पेट्रोलने भावाची शंभरी पार केली. प्रथमच पेट्रोलचे भाव शंभरी पार गेले आहेत. सलग बाराव्या दिवशी शहरात पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ झाली.
शनिवारी पॉवर पेट्रोलचा भाव १००.३१, साधे पेट्रोल ९६.६२ आणि डिझेलचा भाव ८६.३० रुपयांवर गेला आहे. पेट्रोलची मूळ किंमत २८.२३ आणि डिझेलची २७.२२ रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल पंपचालकाला एक लिटर पेट्रोलमागे ३.५६ आणि डिझेलला २.५२ रुपये मिळतात. उर्वरित रक्कम केंद्र सरकारचा अबकारी कर, राज्य सरकारचा मूल्यवर्धितकर (व्हॅट) आणि सेस भरावा लागत आहे.
कोरोनामुळे आटलेली गंगाजळी भरून काढण्यासाठी इंधन कराचा मार्ग स्वीकारला जात आहे. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत केंद्र सरकारने तीनदा अबकारी कर वाढविला. एप्रिल-२०२०मध्ये राज्य सरकारने २ रुपये प्रतिलिटर सेस लागू केला. नोव्हेंबर-२०२० पासून सातत्याने इंधनाचे भाव वधारत आहेत. शंभरीचा उंबरठा पार केल्यानंतर इंधन दरवाढीला लगाम लागला नाही. तसेच ९ फेब्रुवारीपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या बारा दिवसांत लिटरमागे पेट्रोलचे भाव ३.१४ आणि डिझेलचे भाव ३.५६ रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या भावात पेट्रोलहून अधिक वाढ होत आहे. मालवाहतुकीसाठी आणि प्रवासी वाहनांच्या माध्यमातून डिझेलचा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे डिझेलवर अधिक भार टाकला जात आहे.
---
तीन महिन्यांत उडाला इंधन भडका
नोव्हेंबर-२०२० पासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत पेट्रोलच्या भावात प्रतिलिटर ८.९५ आणि डिझेलच्या भावात १०.५९ रुपयांनी वाढ झाली.
---
इंधनाचे भाव
तारीख पेट्रोल डिझेल
२० नोव्हेंबर २०२० ८७.६७ ७५.७१
१९ डिसेंबर २०२० ९० ७८.९७
१९ जानेवारी २०२१ ९१.४७ ८०.५८
२० फेब्रुवारी २०२१ ९६.६२ ८६.३०