सणवार साजरे करा; पण कोरोनाचे नियम पाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:33+5:302021-01-21T04:10:33+5:30
पुणे : लॉकडाऊननंतर आता ‘न्यू नॉर्मल’ सुरू झाले आहे. सण-समारंभांमुळे सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले आहे. नववर्षातला पहिला सण म्हणजे ...
पुणे : लॉकडाऊननंतर आता ‘न्यू नॉर्मल’ सुरू झाले आहे. सण-समारंभांमुळे सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले आहे. नववर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्रात. अगदी मकरसंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिलावर्गाचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम रंगतो. यामध्ये तीळगुळाचे वाटप करून संक्रांतीचे वाण लुटण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आहे. मात्र, यंदा संक्रांतीवर कोरोनाचे काहीसे सावट आहे. कोरोनाची लस आली असली, तरी महिलांनी गाफील राहून चालणार नाही. सणाचा आनंद लुटा, पण नियमांचे पालनही करा! मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, अन्यथा कोरोना घराचा उंबरठा कधी ओलांडेल हे सांगता येत नाही, असा इशारा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला आहे.
नवीन वर्षात कोरोनाच्या लशीकरणाची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या तरी आरोग्य कर्मचाऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात ही लस दिली जात आहे. सर्वसामान्यांना ही लस मिळायला पुढील वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे वर्षभर तरी सामान्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. संक्रांतीच्या सणात रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. घरी महिलांना आमंत्रित करताना संख्या मर्यादा ठेवावी, तसेच महिलांना देण्यात येणाऱ्या वाणातूनही कोरोना पसरण्याची भीती असल्याने ते देताना सॅनिटाइज करूनच द्यावे. वस्तुंपेक्षाही मास्क आणि सॅनिटायझर वाण म्हणून देणे अधिक हितावह असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
--
कोट
दरवर्षी आमच्याकडे हळदी-कुंकवासाठी किमान ५० ते ७० महिला येतात. या वर्षी केवळ सोसायटीमधील महिलांनाच हळदी-कुंकवासाठी आमंत्रित केले होते. हळदी-कुंकू लावल्यानंतर हातात वाण न देता, एका ठिकाणी ते ठेवून आपणहून घेण्यास महिलांना सांगण्यात आले होते. महिलांना मास्क आणि हात सॅनिटाइज करणे बंधनकारक केले होते. कोरोना काळातही हा कार्यक्रम आम्ही करू शकलो, याचे समाधान आहे.
- स्वाती घोडके, गृहिणी
-----
पॉझिटिव्ह मृत्यू
१४ जानेवारी २५९ ३
१५ जानेवारी २६१ ३
१६ जानेवारी १९२ ४
१७ जानेवारी २७३ ३
१८ जानेवारी १२१ ६
१९ जानेवारी १८२ ५