शिवजयंती साजरी करा, पण मिरवणुका-सांस्कृतिक कार्यक्रम नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:50+5:302021-02-20T04:26:50+5:30
पुणे : शहरातील गेल्या काही दिवसांमधील कोरोनाबाधितांची वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेने शिवजयंती साधेपणाने साजरी करावी असे आवाहन केले़ ...
पुणे : शहरातील गेल्या काही दिवसांमधील कोरोनाबाधितांची वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेने शिवजयंती साधेपणाने साजरी करावी असे आवाहन केले़ शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये किंवा सदर कार्यक्रम आॅनलाईन पध्दतीने घ्यावेत असेही आपल्या आदेशात नमूद केले आहे़
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत़ महापालिका क्षेत्रात कोरोना-१९ पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त कोणीही प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नयेत़ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम १०० व्यक्तींच्या उपस्थितीत व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून तथा मास्कचा वापर करूनच करण्यात यावे़ याचबरोबर शिवजयंतीनिमित्त्त आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे आयोजित करावीत व कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती कार्यक्रमावर भर द्यावा, असेही या आदेशात नमूद केले आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम घेऊन महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे़
-----------------------------