सवत्स धेनू पूजनाने वसुबारस साजरी
By admin | Published: October 21, 2014 05:22 AM2014-10-21T05:22:18+5:302014-10-21T05:22:18+5:30
: पिंपरी, चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील ठिकठिकाणी सवत्स धेनू पूजनाने सोमवारी वसुबारस साजरी करण्यात आली.
पिंपरी : पिंपरी, चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील ठिकठिकाणी सवत्स धेनू पूजनाने सोमवारी वसुबारस साजरी करण्यात आली. विशेषत: ग्रामीण पट्ट्यात विशेष उत्साह पाहण्यास मिळाला. वसुबारसेला गाईची वासरासह सायंकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीमातेचे आगमन व्हावे, या उद्देशानेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची परंपरा आहे.
भोसरी, मोशी, चऱ्होली, तळवडे, चिखली, ताथवडे, थेरगाव, किवळे परिसरातील विकासनगर, बापदेवनगर, माळवलेनगर, दत्तनगर, रावेत, शिंदेवस्ती, भोंडवे वस्ती, लक्ष्मीनगर झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या भागात गायींचे प्रमाण नगण्य उरले आहे. त्यामुळे गोमाता पूजनाचे कार्यक्रम विविध मंडळांनी आयोजित केले होते.
सुवासिनींनी गाईच्या पायावर पाणी घालून नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून विधिवत पूजा केली. त्यानंतर निरांजनाने ओवाळून गाईला गोडधोडाचा नैवेद्य खाऊ घातला.
मावळातील तळेगाव दाभाडे, कामशेत, पवनानगर, उर्से, गहुंजे व सांगवडे आदी भागात या सणानिमित्त उत्साही वातावरण होते. शेतकरी कुटुंबातील महिलांनी घरांपुढे व गोठ्यात गोमाता पूजन करून वसुबारस साजरी केली. (वार्ताहर)