पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला
By नितीश गोवंडे | Published: June 1, 2023 03:51 PM2023-06-01T15:51:04+5:302023-06-01T15:51:23+5:30
महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली
पुणे: महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली. मध्य रेल्वेचा अग्रदुत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. पुणे-मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे रुळावर धावणारी ही पहिली डिलक्स रेल्वे होती. या दख्खनच्या राणीने आज (१ जून २०२३) ९४ व्या वर्षात पदार्पण केल्याने सकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात या क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या रेल्वेच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकात पाटील, स्टेशन मास्तर मदनलाल मीना, सहायक स्टेशन मास्टर सुनील ढोबळे, जनसंपर्क अधिकारी अजय कुमार यांच्यासह रेल्वेच्या अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर ‘डेक्कन क्वीनला ९४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे लिहिलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तुतारी, ढोल-ताशाच्या गजरात ९४ किलोचा शाकाहारी केक कापून या रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना तो देण्यात आला. यावेळी संपूर्ण रेल्वेला सजवण्यात आले होते. काही हौशी महिलांनी डेक्कन क्वीनसाठी हौशीने कॅडबरी पासून बनवलेले केक देखील आणले होते. आज सकाळी पाच वाजल्यापासून असंख्य प्रवासी जणू आपल्या घरातील कार्य आहे, अशा लगबगीत दिसून आले.
रेल्वे फलाटावर येतात, प्रवाशांसह अन्य रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांनी डेक्कन क्वीन सोबत सेल्फी घेत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. काळानुसार डेक्कन क्वीनमध्ये अत्याधुनिक बदल करण्यात आले असले, तरी पुणेकरांसोबत या रेल्वेची जोडलेली नाळ मात्र तशीच आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेचे पूजन करून रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
''दरवर्षी मी पुढाकार घेऊन डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करते. आज या रेल्वेने ९४ व्या वर्षात पदार्पण केले याचा अत्यानंद आहे. येत्या काही वर्षात ही रेल्वे १०० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. आजपासूनच मी त्यासाठीच्या तयारीला लागले आहे. माझ्यासह या रेल्वेवर प्रेम करणारे अनेक प्रवासी आज रेल्वे स्टेशनवर हजर होते. या रेल्वेतील पूर्वीप्रमाणे पॅन्ट्रीकार फक्त सुरू करण्यात यावी, एवढीच आमची रेल्वे प्रशासनाकडे विनंती आहे. - हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप''