अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगार देणारा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 05:53 AM2019-09-01T05:53:42+5:302019-09-01T05:53:46+5:30

आनंद सराफ सार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. वर्धिष्णू वृत्ती आणि परिवर्तनशीलता या दोन गुणांमुळे काळाच्या कसोटीवर टिकून ...

 Celebration of economy boosting and employment | अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगार देणारा उत्सव

अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगार देणारा उत्सव

आनंद सराफ

सार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. वर्धिष्णू वृत्ती आणि परिवर्तनशीलता या दोन गुणांमुळे काळाच्या कसोटीवर टिकून गणेशोत्सव वर्षानुवर्षे वाढत चालला आहे. हा उत्सव समाजाची गरज आहे. कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा, कलाकारांचे व्यासपीठ, समाजोपयोगी अर्थकारण, समरसतेचे अंगण आणि तनामनाला उर्जा देणारा हा उत्सव आहे. गणेशोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारी ही गुणवैशिष्ट्ये आजतागायत टिकून आहेत.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये अर्थशक्ती शेतीमध्ये बंदिस्त असताना अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि रोजगार निर्माण करणारा गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा समाजमान्य उत्सव आहे. हा फक्त एका देवाधर्माचा उत्सव न राहता संपूर्ण देशाचा एवढेच नव्हे, तर आज जगभरातील १२२ छोट्या-मोठ्या देशांमध्ये हा उत्सव पोहोचला आहे. परदेशामध्येही हा उत्सव धुमधडाक्यात साजरा होतो आहे यावरून या उत्सवाचे लोकांच्या मनातील स्थान अधोरेखित होते. काळाच्या कसोटीवर टिकून राहाणे, तो वाढणे हे गुणविशेष या महोत्सवात असल्याने त्याच्यातले दूषित प्रवाह आपसूक बाजूला होतात. गणेशोत्सवाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, ती इतर कुठल्याही उत्सवात पाहायला मिळत नाहीत. उत्सवाचे एकमेवाद्वितीय असे हे उदाहरण आहे. उत्सवाने कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारचा उत्साह संचारतो. उत्सवातून सामाजिक अभिसरण होतं असल्याने समाजातील प्रत्येक घटकाला गणेशोत्सव आपला वाटतो. आजमितीला गणेशोत्सव हा विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित न राहता, धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करून समाजाला एकसंघ ठेवण्यात मोलाची मदत करणारा असा उत्सव झाला आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ म्हणून हा उत्सव सुरू केला असला, तरी बदलत्या काळातसुद्धा आपापले स्वरूप बदलून वैशिष्ट्य कायम ठेवत आपल्यावरच उपकार केले आहेत. गणेशोत्सव अधिकाधिक व्यापक होत जाईल, यात शंकाच नाही.


लेखक गणेशोत्सव अभ्यासक, आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत (पुणे )

Web Title:  Celebration of economy boosting and employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.