पुण्यात शाही थाटात शतकोत्तर रौप्य महोत्सवी विसर्जन मिरवणूक संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 11:20 AM2017-09-05T11:20:22+5:302017-09-05T20:53:55+5:30
पुणे, दि. 5 - फुलांची उधळण, रंगोळीच्या पायघड्या, ढोलताशाचा गजर, सनई चौघडयाचे मंगलमय सुर अन बाप्पाचा जयघोष अशा भक्तिमय ...
पुणे, दि. 5 - फुलांची उधळण, रंगोळीच्या पायघड्या, ढोलताशाचा गजर, सनई चौघडयाचे मंगलमय सुर अन बाप्पाचा जयघोष अशा भक्तिमय वातावाराणात वैभवशाली मिरवणुकीने शहरातील मानाच्या पाच गणपतीना निरोप देण्यात आला. नेहमीच्या परंपरेनुसार विसर्जन मिरवणूक सकाळी 10.30 वाजता सुरु झाली. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ही मिरवणुक ऐतिहासिक ठरली. शहरातील महात्मा फुले मंडई समोरील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. महापौर मुक्ता टिलक, उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार नीलम गोह्रे, मेधा कुलकर्णी, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पालिका आयुक्त कुणाल कुमार, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह पक्ष-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरयाचा जयघोष झाल्या नंतर ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकी समोर कला अकादमीच्या कलाकारांनी रंगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. तसेच चौका-चौकात भव्य रंगोळी साकारण्यात आली होती. लक्ष्मी रस्ता या मुख्य मिरवणुक मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. तसेच ढोल ताशा पथकानी केलेले वादन अन प्रात्यक्षिकाना उत्स्फुर्त दाद मिळत होती. कडक उन्हातही मिरवणुकीतील उत्साह उत्तरोत्तर वाढतच गेला.
फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीत सर्वात पुढे नगरावादन सुरु होते. त्यापाठोपाठ काही मराठी कलाकारांचा समावेश असलेल्या कलावंत ढोल ताशा पथकाने वादन करून बाप्पला वंदन केले. कामायनी संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पथकाने मने जिंकली. तर पारंपरिक वेशभुषेत सहभागी झालेल्या परदेशी तरुणीनी लक्ष वेधून घेतले. चार वाजण्याच्या सुमारास कसबा गणपतीचे विसर्जन झाले.
मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन 5.30 वाजता झाले. फुलानी सजविलेल्या पालखीमधे बाप्पा विराजमान झाले होते. तीन ढोल ताशा पथका सह एक बैंड पथक आणि ईशान्य राज्यातील काही विद्यार्थंचे पथक मिरावणुकीत सहभागी झाले होते. अश्व पथकामधे शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला मुलगा आणि पारंपरिक वेष भुषेतील महिलानी लक्ष वेधून घेतले.
मानाच्या तिसऱ्या गुरूजी तालीम गणपतीची मिरवणुक विविधरंगी फुलानी सजविलेया विविध वाद्यांच्या आकर्षक रथात काढण्यात आली. गुलालाची मुक्त उधळण आणि ढोल ताशा पथकाचें दमदार वादन हे या मिरणुकीचे वैशिष्ठ ठरले.
विविध रंगी फुलानी सजविलेल्या गरुड रथात मानाच्या चौथ्या तुलशी बाग गणपतीची मिरवणूक लक्ष वेधक ठरली. स्वरुपवर्धिनी पथकातील मुलानी सादर केलेली मल्लखांबची प्रात्यक्षिक, तलवारबाजी आणि लाठी काठी ची चित्त थरारक कसरतीना गणेश भक्तांनी उत्स्फूर्त दाद दिली. सायंकाळी श्रीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.
मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन सायंकाळी करण्यात आले. फुलानी सजविलेल्या पारंपरिक पालखीमध्ये गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांची 125 वर्षांपूर्वी झालेल्या भेटीचे स्मरण करणारा देखावा केंद्र बिंदु ठरला. तसेच ढोल ताशा पथकानी केलेले वादन ही वाह वाह मिळवून गेले.
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे
शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, स्वारगेट),
लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक, नाना पेठ ते टिळक चौक, अलका टॉकीज चौक),
बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक),
बाजीराव रस्ता (बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज, शनिवारवाडा),
कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे कोपरा, शनिपार),
गणेश रस्ता (दारूवाला पूल ते जिजामाता चौक),
गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक),
टिळक रस्ता (जेधे चौक ते टिळक चौक),
शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक),
जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडूजीबाबा चौक),
कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडूजीबाबा चौक),
फर्ग्युसन रस्ता (खंडूजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार),
भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक ते नटराज चौक),
पुणे-सातारा रस्ता (होल्गा चौक ते जेधे चौक),
सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक),
प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक).
नो पार्किंगची ठिकाणे पुढीलप्रमाणे (सकाळी ८ ते मुख्य मिरवणूक संपेपर्यंत)
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन रस्ता, खंडूजीबाबा चौक ते वैशाली यांनी जोडणाºया उपरस्त्यांचे १00 मीटर परिसरात पार्किंगसाठी बंदी करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीनिमित्त बाह्यवळण मार्ग (रिंग रोड) पुढीलप्रमाणे
कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक-विधी महाविद्यालय रस्ता-सेनापती बापट रस्ता- सेनापती बापट रोड जंक्शन, गणेशखिंड रस्ता-वेधशाळा चौक-संचेती हॉस्पिटल चौक-अभियांत्रिकी महाविद्यालय-आंबेडकर रस्ता- शाहीर अमर शेख चौक-मालधक्का चौक-बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरू रस्ता-संत कबीर चौक-सेव्हन लव्हज चौक-वखार महामंडळ चौक-शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केट यार्ड-सातारा रस्ताने व्होल्गा चौक-सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक-सावरकर चौक-दांडेकर पूल-शास्त्री रस्त्याने-सेनादत्त पोलीस चौकी-अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल-नळस्टॉप
पार्किंगची ठिकाणे
एच. व्ही. देसाई कॉलेज शनिवार पेठ, पुलाची वाडी- नदीकिनारी, पूरम चौक ते हॉटेल विश्व (रस्त्याच्या डाव्या बाजूस), दारूवाला पूल ते खडीचे मैदान (गणेश रस्ता), गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, काँग्रेस भवन (मनपा रस्ता), जयवंतराव टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नारायण पेठ बाजूकडील नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग नारायण पेठ
वाहनचालकांना वळण्यासाठी उपलब्ध रस्ते पुढीलप्रमाणे :
जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक), शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा), मुदलीयार रस्ता (अपोलो टॉकीज), नेहरू रस्ता (संत कबीर चौक), सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक), सातारा रस्ता (होल्गा चौक), बाजीराव रस्ता (सावरकर पुतळा चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक), फर्ग्युसन रस्ता (गोखले स्मारक चौक)