Pune Dahi Handi: आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व माऊलींचा जन्मोत्सव भक्तीभावे साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:56 PM2024-08-27T12:56:15+5:302024-08-27T12:57:09+5:30
दरम्यान रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव व भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी परंपरेचे पालन करत मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. मध्यरात्री बाराच्या सुमारास 'माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय' अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर विधिवत गोकूळ पूजा पार पडली. यावेळी माऊलींच्या समाधीवर श्रीकृष्ण अवतार साकारण्यात आला.
तत्पूर्वी सोमवारी (दि. २६) पहाटे ११ ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात माउलींच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास अखंड हरिनाम सप्ताहाची गाथा - भजनाने सांगता करण्यात आली. संध्याकाळी ह.भ.प. नामदेव महाराज शास्री यांचे विणा मंडपात कीर्तन झाले. तर रात्री १० ते १२ यावेळेत मोझे सरकार यांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. त्याचवेळी विणा मंडपात आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने गावकरी भजन सेवा करण्यात आली.
दरम्यान रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी माउलींवर पुष्पवृष्टी केली. तद्नंतर 'श्रीं'ची आरती झाली. यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या वतीने गोकूळ पूजा व मानकऱ्यांना नारळ, प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वेदांत चोपदार, बाळासाहेब चोपदार, ऋषीकेश आरफळकर, योगीराज कुर्हाडे, राहुल चिताळकर, योगेश आरु, स्वप्नील कुर्हाडे, ह.भ.प. बापूसाहेब मोरे, मुखेकर शास्री महाराज, वेद महाराज लोंढे आदींसह आळंदीकर ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवनिमित्त देवस्थानच्या वतीने उपवासाची खिरापत देण्यात आली. माजी सभापती डी. डी. भोसले पाटील यांनी शेंगदाण्याची उसळ व सुंठवडा तसेच आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने दिवसभरात २०० लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव व भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हजारो भाविकांनी दर्शनबारीतून माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.