तुकोबांचा सोहळा पंढरीकडे
By admin | Published: June 16, 2017 09:42 PM2017-06-16T21:42:45+5:302017-06-16T21:51:54+5:30
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र पंढरीकडे शुक्रवारी सायंकाळी साडेचारला प्रस्थान ठेवले.
विश्वास मोरे/ऑनलाइन लोकमत
देहूगाव, दि. 16 - संपदा सोहळा नावडे मनाला । करी ते टकळा पंढरीचा ॥
जावे पंढरीसी आवडी मनासी । कधी एकादशी आषाढी हे ॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे॥ अशी विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र पंढरीकडे शुक्रवारी सायंकाळी साडेचारला प्रस्थान ठेवले. वीणेचा झंकार, अखंड हरिनाम, टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत इंद्रायणी तीरावरून भक्तीचा सागर भूवैकुंठातील महासागरात एकरूप होण्यासाठी निघाला.
भागवत धर्मातील वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक वैभवाचे दर्शन घडविणारा सोहळा म्हणजेच आषाढी वारी पालखी सोहळा होय. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३२ वे वर्ष. पालखी सोहळ्याचे प्रस्थान असल्याने देहूनगरीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. सकाळपासूनच अपूर्व उत्साह जाणवत होता. खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका हाती घेऊन वारकरी देहूनगरीत दाखल होताना दिसत होते.
तत्पूर्वी पहाटे पाचला श्रींची महापूजा व शिळामंदिरातील महापूजा सोहळाप्रमुख व विश्वस्तांच्या हस्ते झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज समाधीची महापूजा सहाला विश्वस्त व मनुशेठ वालिया यांच्या हस्ते झाली. इंद्रायणीत स्रान करून कपाळी अष्टगंध लावून, खांद्यावर भगवी पताका घेऊन सकाळपासूनच मुख्य मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत होती. मंदिरातच सकाळी १०ला संभाजीमहाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुसरीकडे इनामदारवाड्यात तुकोबारायांच्या पादुकांची दिलीप मोरे यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर परंपरेनुसार म्हसलेकर मंडळींनी दुपारी पादुका मुख्य मंदिरात आणल्या. उन्हाची तीव्रता असतानाही वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. प्रस्थानाची वेळ समीप आल्याने मुख्य मंदिरात दिंडेकऱ्यांनी जागा धरली होती आणि टाळ-मृदंग गजर सुरू झाला. त्यानंतर मानाच्या अश्वांना पाचारण करण्यात आले. त्या वेळी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. दुसरीकडे वीणा मंडपात पावणेतीनला प्रस्थान सोहळा सुरू झाला. या वेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरिजा बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार विलास लांडे, देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे, सुनील दिगंबर मोरे व जालिंदरमहाराज मोरे आदी उपस्थित होते.
सोहळ्यासाठी पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त तैनात होता. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीची कामे अपूर्ण असल्याने नेहमीपेक्षाच्या गर्दीवरही काहीसा परिणाम जाणवत होता. तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल केला होता. सीसीटीव्हीची नजरही सोहळ्यावर होती. वीणा मंडपात महापूजा झाल्यानंतर आरती झाली. त्यानंतर सोहळ्यातील मानकरी, सेवेकरी, दिंडेकऱ्यांचा नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पादुका मोहक फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. ह्यपुंडलिक वरदे हरी विठ्ठल...ह्ण असा जयघोष झाला. तुतारी वाजली, टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. त्यानंतर देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली आणि सायंकाळी साडेचारला वीणा मंडपातून पालखी बाहेर आली. या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. आज सोहळा गावातील इनामदारवाड्यात मुक्कामास राहणार असून, शनिवारी सकाळी सोहळा आकुर्डीतील मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.