पाणीटंचाईच्या काळातही सिमेंट रस्त्यांची कामे, निविदा प्रक्रिया पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:11 AM2018-12-24T03:11:06+5:302018-12-24T03:11:25+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पुणे शहरात गंभीर पाणी संकट उभे राहिले आहे.
- सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पुणे शहरात गंभीर पाणी संकट उभे राहिले आहे. शहरात या गंभीर पाणीटंचाईच्या काळातही सिमेंट रस्त्यांची कामे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या वतीने चालू अंदाजपत्रकात तब्बल ८० ते १०० कोटी रुपयांची सिमेंट रस्त्यांची कामे प्रस्तावित केली आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत शहरामध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवातदेखील होईल. सिमेंट रस्त्यांच्या कामे थांबविण्याचा निर्णय घेतल्यास महापालिका प्रशासनासमोर एवढा मोठा निधी खर्च करण्याचा गंभीर प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. यापैकी काही कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर तर काही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतात. यापैकी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर रस्त्यांच्या एकूण कामांपौकी तब्बल ६० टक्के कामे ही केवळ सिमेंट रस्त्यांची असतात. गल्लीबोळातील बहुतेक सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटमध्ये करण्यात येतात. तर महापालिका प्रशासनाच्या स्तरावरून प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांमध्ये ४० टक्के रस्त्यांची कामे ही सिमेंट काँक्रीटमध्ये केली जातात.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू अंदाजपत्रकातील कामे आचरसंहिता लागण्यापूर्वी खर्च टाकण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामुळे रस्त्यांच्या एकूण कामांपैकी सुमारे १०० ते ८० कोटी रुपये सिमेंट रस्त्यांसाठी खर्च करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा व वर्क वॉडरची प्रक्रिया जवळजळ पूर्ण होत आली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू होतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सिमेंट क्रॉँक्रीटची कामे थांबवा : स्थायीसमोर बंदीचा ठराव
शहरामध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली असून, सध्या शहरात सुरु असलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे तातडीने थांबवा, अशी लेखी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे.
याशिवाय नगरसेवक अश्विनी कदम यांनीदेखील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना बंदी घालण्याच्या मागणीचा ठराव स्थायी समितीला दिला आहे.
आगामी निवडणुका व कामे सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण झाल्याने सध्या तरी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना बंद घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कामे सुरू करण्याची सर्व प्रकिया पूर्ण
शहरामध्ये क्षेत्रीय कार्यालयांसह सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही कामे सुरू होतील. परंतु याबाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मात्र सिमेंट रस्त्यांची कामे थांबविण्याचा निर्णय घेतल्यास यासाठी निश्चित केलेल्या निधीचे काय करायचे याचा निर्णय घ्यावा लागले.
- अनिरुद्ध पावसकर, पथविभाग प्रमुख
सर्व पक्षांशी चर्चा करून निर्णय
शहरात सुरु असलेली व प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे थांबविण्याबाबत एका सदस्यांनी स्थायी समितीकडे ठराव दिला आहे. परंतु याबाबत सर्व पक्षांची चर्चा करून सिमेंट रस्त्यांची कामे थांबवायची की काय अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे अद्याप तरी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबाबत काही निर्णय झाला नाही.
- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष