Roads In Pune: पुण्यात सर्वत्र सिमेंटचे रस्ते; पाणी पिणारे रस्ते केल्यास हाेईल पूरस्थितीतून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:35 PM2022-10-20T12:35:04+5:302022-10-20T12:35:16+5:30
सिमेंटला पर्याय हाय परफाॅर्मन्स परव्हियस क्राॅंक्रीटचा : वाहण्याऐवजी लगेच झिरपेल पाणी
श्रीकिशन काळे
पुणे : शहरात सर्वत्र सिमेंटचे रस्ते झाल्याने पावसाचे पाणी झिरपत नाही. परिणामी, ते वाहते आणि एका ठिकाणी आले की तिथे पूरस्थिती निर्माण होते. यावर एक उपाय आहे; परंतु, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सिमेंटऐवजी हाय परफाॅर्मन्स परव्हियस क्राॅंक्रीट वापरले, तर रस्तेदेखील पाणी लगेच जिरवू शकतात. परिणामी, पुराचा धाेका टळेल, असा दावा पर्यावरणतज्ज्ञ व आर्किटेक्ट सारंग यादवडकर यांनी केला.
सारंग यादवडकर म्हणाले...,
- हाय परफाॅर्मन्स परव्हियस क्राॅंक्रीट वापरून रस्ते करण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता; पण त्यांनी त्यावर काहीच केले नाही. कदाचित पैसे लागत नाहीत, टेंडर निघणार नाही म्हणून अधिकारी करत नसतील.
- हा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्तांना दिला होता; पण आयुक्तांनी त्यावर काहीच उत्साह दाखवला नाही. परिणामी, सद्यस्थितीत पुणेकरांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. वेळीच सिमेंटऐवजी हाय परफाॅर्मन्स परव्हियस क्राॅंक्रीट वापर केलेले रस्ते तयार केले असते, तर पुणे पाण्यात गेल्याचे चित्र पाहायला मिळाले नसते.
- शहरातील रस्ते, पादचारी मार्ग, अंतर्गत रस्ते हे सर्वच सिमेंट ऐवजी हाय परफाॅर्मन्स परव्हियस क्राॅंक्रीट वापरून केल्यास पाणी ज्या- त्या ठिकाणी जिरेल आणि कुठेही पाणी साठणार नाही.
ठाेस उपाययाेजना आवश्यक
शहरात सुमारे १,४०० किमीचे रस्ते आहेत. त्या सर्वांवर पाणी झिरपत नसल्याने ते वाहून जाते. मग, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी एकत्र आले तर ते पाणी जाणार कुठे, म्हणून आता उपाययोजना करणे आवश्यक आहे.
परव्हियस क्राॅंक्रीट काय असते?
परव्हियस क्राॅंक्रीटमध्ये सिमेंटऐवजी खडी किंवा छोटे दगड वापरले जातात. जेणेकरून त्या छोट्या दगडांमधून पाणी लगेच झिरपले जाईल. अशा प्रकारचे रस्ते परदेशात तयार केले आहेत.
निधी उपलब्ध, तरी पालिकेचे दुर्लक्ष
रस्ते तयार करताना हाय परफाॅर्मन्स परव्हियस क्राॅंक्रीट वापरावे. हे क्राॅंक्रीट पोरस असते. त्यातून पाणी झिरपते. त्यावरून पाणी वाहून जात नाही. असे रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेला पाच वर्षांपूर्वी प्रस्ताव दिला होता. त्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांनी खासदार निधीमधून चार लाख रुपये उपलब्ध केले होते; पण त्यावर पालिकेने काहीच केले नाही. अशा रस्त्याने स्टाॅम वाॅटर ड्रेनेजचा खर्च वाचेल; पण हे त्यांना नकोय, असेही सारंग यादवडकर म्हणाले.