नदीकाठचे सिमेंटीकरण करणे म्हणजे संवर्धन नव्हे! - सुशोभीकरणामुळे जैवविविधतेला धोका; नैसर्गिक झरे नदीचा प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:04+5:302021-04-19T04:10:04+5:30
सहा-सात वर्षांपुर्वी मुठा नदी सुधार योजनेवर चर्चा सुरू आहे. सध्या मुठा नदीचे गटार झाले असून, तिचा सुधार करायचा असेल ...
सहा-सात वर्षांपुर्वी मुठा नदी सुधार योजनेवर चर्चा सुरू आहे. सध्या मुठा नदीचे गटार झाले असून, तिचा सुधार करायचा असेल तर फक्त त्यात सांडपाणी सोडू नये, हाच एक चांगला उपाय आहे. पण महापालिका प्रशासन त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी पुढाकार घेत आहे. नदीपात्रात सांडपाणी सोडणे बंद केले तर नदी आपोआप स्वच्छ होऊ शकते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी उभारणार आहेत. त्यानंतर नदी काठी बसण्यासाठी सिमेंटीकरण होणार आहे. याविषयी नदी अभ्यासक संतप्त झालेले असून, त्यांना हा सुशोभीकरणाचा प्रकल्पच नको आहे. त्यासाठी अनेकदा महापालिकेकडे निवेदन, पाठपुरावा केला. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता नागरिकांनीच जोरदार रेटा देऊन नदी संवर्धनासाठी पुढे येणे गरजेचे आहे. अन्यथा नाशिकच्या गोदाकाठी सिमेंटीकरण केले आणि नंतर पुन्हा ते उखडावे लागले. असा प्रकार मुठाकाठी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
——————————————-
नदी सुधारवर अनेकदा चर्चा झाली आहे. या प्रकल्पाने नदीकाठचा वेटलँड नष्ट होणार आहे. क्राँक्रिटीकरणामुळे तेथील पक्षी कमी होतील, इकॉलॉजीचे नुकसान होणार आहे. नदी जशी आहेे तशी ठेवावी. विनाकारण सिमेंटीकरण करणे टाळावे. नदीचे प्रदूषण कमी होण्यासाठी तो निधी वापरायला हवा. सुशोभीकरण करू नये. स्थानिक पातळीवरील जैवविविधता जपली पाहिजे. तेच खरं सुशोभीकरण ठरेल.
- मंजूश्री सावडी, नदी अभ्यासक
————————————————-
गोदावरीकाठ झाला क्राँक्रिटीकरणमुक्त
गोदापात्रातील क्राँक्रिटीकरणाचा वाद देखील अनेक वर्षांपासून गाजत होता. तिथेही क्राँक्रिटीकरण करण्यात आले होते. ते काढण्यासाठी नदीप्रेमी देवांग गांधी यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. त्यानुसार गेल्या वर्षी नदीकाठचे क्राँक्रिटीकरण काढून टाकण्यात आले. त्यानंतर तिथले १७ नैसगिर्क कुंड उघड झाले आणि त्यातून पाणी पुन्हा नदीत येऊ लागले.
——————————————————
काठावरील नैसर्गिक झरे जिवंत हवे
मुठा नदीकाठी अनेक ठिकाणी नैसर्गिक झरे आहेत. त्या झऱ्यांमुळेच नदी प्रवाही राहत असते. त्यामुळे असे झरे जिवंत ठेवायला हवेत. जर नदीकाठी सिमेंटीकरण केले तर हे सर्व झरे मरून जातील आणि नदीत स्वच्छ पाणी जाणे बंद होईल.
————————————————
प्रकल्पात काठाच्या सौंदर्यावर तसेच लोक॔साठी उपलब्ध जागा - जाॅगिंग ट्रॅक, बोटॅनिकल गार्डन इत्यादी याची जास्त माहिती दिसतेय. पण नदी पुनरुज्जीवनासाठी नक्की काय असणार आहे ते समजत नाही. नदीमधला घनकचरा काढला, अतिक्रमणे हटवली, पूररेषांचे कडक पालन करून कठोर अंमलबजावणी केली, तसेच नदीत होणारे मलनिस्सारण थांबवले तर नदी सुंदरच होणार आहे. जाॅगिंग ट्रॅक वेबसाइटवर सिमेंटचे दिसत आहेत. तसेच नदीच्या आकर्षक वळणाना सरळ केलेले दिसते आहे. नदीचे मूळ सुंदर रूप घालवून अनैसर्गिक बागांनी मेकअप केलेल्या नद्या हे नक्कीच पुण्याचं नैसर्गिक वैभव होऊच शकत नाही. मेट्रोने मुठा नदीला मारले आहे. त्यामुळे असल्या प्रकल्पातून नद्या कश्या वाचणार आहेत, हे पुणेकराना समजणे आवश्यक आहे. नदीची जागा अबाधित राहून नदीला मिळवून देणे यावर जास्त काम व्हायला पाहिजे. तो तिचा संविधानाने दिलेला अधिकार आहे.आपल्या हक्कांबद्दल आग्रही राहाताना नदीच्या अधिकारांचा विचार झालेला कुठेच दिसत नाहीये.
- शैलजा देशपांडे, संस्थापक, जीवित नदी